– ताला , कपाट फोडले : माधव व ओम नगर निशाण्यावर
– पेट्रोलिंग नसल्याने चोरट्यांची मुभा सैल
मारेगाव : दीपक डोहणे
पोळा सणानिमित्त मूळगावी गेलेल्या घरात शिरून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह लाखो रुपयांचा रोख रकमेवर मारेगावातील माधव व ओम नगरीतील तब्बल 12 जणांच्या घरावर डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.एकाच रात्री डझनभर घरफोडीने चोरट्यांना पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पोळा सण व सलग सुट्ट्या असल्याने येथील माधव नगरी व ओम नगरी येथील काहींनी मूळ गावी जाण्याचे पसंत केले.हाच धागा पकडून चोरटे हे मध्यरात्री प्रभागात शिरले.माधव नगरी येथील राजू डवरे , रमेश बोंडे , हेमराज कळंबे , संजय काकडे , सुंदरलाल आत्राम , देविदास भोयर , प्रभाकर जुमडे , संदीप राजगडे , सुनील भोयर , श्रीमती स्वाती आत्राम यांच्या सह ओम नगरी येथील सुरज चिंचोलकर , कविश्वर चांदेकर यांच्या घराचे कोंडी उलवत कपाट फोडले.यातून अनेकांच्या घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे आभूषणे व हजारो रुपयांची रोख रक्कम लांबविली.या घटनेने प्रचंड दहशत पसरली आहे.
दरम्यान , चोरटे हे चारचाकीने येऊन वाहन वेगळ्या ठिकाणी ठेवून प्रभागात शिरल्याचा कयास व्यक्त होत आहे.परिणामी मागील अनेक दिवसांपासून पोलिसांच्या पेट्रोलिंगला हरताळ फासला असून रात्रीच्या गस्तीला असलेला गुरखाही प्रभागाकडे फिरकत नसल्याने येथील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
मारेगाव येथील डझनभर घरफोडीने चोरट्यांना पकडण्याचे तगडे आव्हान उभे ठाकले असतांना निर्मिती नगरातही घरफोडी झाल्याची चर्चा आहे.या घटनेने मारेगावात पुरती खळबळ माजली आहे.