– निष्ठावानात पसरली अस्वस्थता
– काँग्रेस आता औषधापूरत
( भाग – 2 )
मारेगाव : दीपक डोहणे
कधी काळी काँग्रेसचा अभेद्य किल्ला म्हणून मारेगाव तालुका ओळखला जात असे. इथे अन्य पक्षाचे नेते अत्यल्प होते.प्रत्येक गावा-गावात काँग्रेस होती.मात्र यावेळी अनर्थ घडला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मोठा भूकंप झाला. ऐनवेळी टोपी फिरली. निष्ठावान नेत्याच्या हाती तुरी देण्यात आल्या. यामुळे नेते, कार्यकर्ते कमालीचे दुखावले आहे. मारेगावात काँग्रेस आता इतिहासात जमा होण्याच्या मार्गावर आहे.
मारेगाव तालुक्यात अनेक ग्रामपंचायत, सहकारी संस्था , स्वराज्य संस्था यात काँग्रेस भरघोस मतांनी निवडून यायची.तालुक्यात पाटलां पासून तर थेट शेतमजुरापर्यंत काँग्रेसचे लोण पसरले होते. अनेक प्रतिष्ठांनी शेतीवाडी विकून काँग्रेस जगविली. मात्र अलीकडे काँग्रेसच्या टोपीबाज नेत्याने पक्ष ध्येय धोरण वेशीवर टांगले. आपल्या स्व:हीताचा खेळ मांडला. सावकाराने वजनदार पॉकिट फेकले. “आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे” असेच झाले. मलिदा मिळाला अन् सत्तेचा सरा खेळच पालटला. पॉकेट संस्कृती काँग्रेसमध्ये शिरल्याने बाजार समिती निवडणूकीत दिग्गज काँग्रेस नेतृत्व अरुणाताई खंडाळकर , अभ्यासू पक्ष संघटक वसंतराव आसुटकर हे कमालीचे निराश झाले.त्यातूनच काँग्रेसचा मोठा चाहतावर्ग खूप अस्वस्थ झाला. अरूनाताई च्या वाढदिवसात सारे काही प्रकर्षाने दिसले.वेगाव क्षेत्राचे दिग्गज व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर , नवरगाव परिसरात मजबूत पकड असलेले नानाजी पाटील डाखरे यांनी काँग्रेस मधील “वरून कीर्तन आतून तमाशा” होणार हे आधीच समजून घेतले.त्यांनी सावध पवित्र घेत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नेतृत्वापासून फारकत घेतली.
दलित समाजाचे प्रतिनिधी असणारे उदयबाबू रायपूरे, मुस्लिम समाजाचे माजी नगरसेवक खालीद पटेल, पहापळ परिसरातील नेतृत्व गणुजी पाटील थेरे , बुरांडा हटवांजरी परिसरातील निष्ठावंत विलासराव वासाडे , शिवणी धोबे येथील अशोकराव धोबे यांनीही ही खेळी पाहून यापूर्वीच अलिप्तताचे धोरण मनोमन स्वीकारले.खूपच आग्रह झाल्यावर मन मारून हे सर्वजन कधी पक्षात केवळ आपली उपस्थिती दर्शवित आहे पण पक्षासाठी मनातून झटण्याचे दिवस आता राहिले नाही हे सर्वांना कळून चुकले. एखाद्या सावकार,शेठजी ने पॉकेट फेकले की वरिष्ठांची लाळ टपकते अन् आपली सारी ढोर मेहनत वाया जाते हे सर्वांनी ओळखून घेतले. या खेळखंडोबा अंतर्गत उफाळलेल्या वादामुळे मारेगाव तालुक्यातील अनेक पोलिस पाटील , सरपंच , उपसरपंच, पदाधिकारी आदींनी काँग्रेसला हात जोडून नमस्कार घातला आहे. यामुळे आता काँग्रेस फक्त औषधा पूरती उरली आहे.पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून पायदळ फिरणारे कार्यकर्ते विजनवासात गेले. बुलेटवर मग्रूर मिरविणे, उठसुठ बॅनरवर झळकणे व ओल्या पार्ट्या झोडपणे या ‘त्रिसूत्रीचा’ अंगीकार करणारे एक अजब-गजब टोळके सध्या काँग्रेसमध्ये शिरले आहे. आणि त्यांनी काँग्रेसचा सत्यानाश होणे सुरू झाले आहे. कांग्रेस सध्या घसरगुंडी वर आहे.
आता बाहेरील सावकार सेठजी , जुगाडबाज टमरेल कार्यकर्ते व हुल्लडबाज चेले चपटे, यामुळे काँग्रेस सध्या बहीरुप्यांचा सोंगाड्या पक्ष झाला आहे.बाजार समिती च्या निकालात उगीच नागपुरी दहा बारा सिक्युरिटी गार्ड आणण्यात आले. फोटो काढणे झाले. पक्षात हे सोंग नेमके कशाला असा सवाल अनेकांनी केला.नेते कमी अन् जोकर अधिक अशी विचित्र स्थिती सद्या पक्षात आहे.दादा कोंडकेच्या सिनेमा पेक्षाही मोठा हास्य पक्षात निर्माण होत आहे.पक्षातील सोंग-धतुरे पाहून लोकं पोट धरून हसत आहे.लोकांचे बरेच मनोरंजन होत आहे.कदाचीत आत्महत्या ग्रस्त तालुक्यातील निराशा दूर करण्यासाठी काँग्रेसच्या उसण्या सावकारी नेतृत्वाला सर्व करावे लागत तर नाही ना ? असे उपहासाने म्हटले जात आहे.
निष्ठावंत लोकांनी हा सारा तमाशा मुकाट्याने पाहात घरी बसने पसंत केले आहे. पक्ष कार्यकर्त्यांना घरी बसणे काँग्रेसला खड्यात नेण्यास पुरेसे ठरत आहे.एखाद्या जातीयवादी पक्षाने काँग्रेस संपविण्यासाठी षडयंत्र रचून हे सर्व सारे सोंगाडे तर पक्षात घुसविले नाही ना ? अशी शंका एका वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. “वणी मे बडे भैय्या – मारेगाव मे मै सैय्या” हा खेळ मस्त सुरू आहे. अनुभवी नेत्यांच्या खादाडवृत्तीने पक्ष आता तालुक्यातून इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. माकड उड्या मारणाऱ्या या चमकोगुरू वर तालुक्यातील एक टोपीबाज नेता अत्यंत आंधळे प्रेम करीत आहे. या नेत्याच्या डोळ्यांचे वरिष्ठ नेत्यानी आपरेशन करून तालुक्यातील कांग्रेस पक्ष वाचवावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते करीत आहे.त्यामुळे सर्व सामान्य बहुजनांचे, मराठा, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसींचे काँग्रेस पक्षात अस्तित्व टिकेल अन्यथा पक्षाचे “हे राम” होणार एवढे मात्र निश्चित.
( उद्या वाचा : काँग्रेस च्या कॅन्सर वर संजीवनीची गरज)