Breaking News

मारेगावात काँग्रेसची जनसंवाद यात्रा ठरली वांझोटी

– नेत्यासह कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ

– “चमकोगिरी”ने पक्ष अडचणीत
( भाग – १ )

मारेगाव : दीपक डोहणे

देशभरात काँग्रेस पक्ष रसातळाला जात आहे.असे चित्र असतांना मारेगाव तालुका हा काँग्रेसचा आधीपासूनच बालेकिल्ला राहीला आहे.मात्र अलीकडेच नव्या छटाकभर, थिल्लर आणि खुज्या नेतृत्वाने पक्षात उच्छाद मांडला आहे. यामुळे काँग्रेस आता कम्युनिस्ट पक्षासारखी संपते की काय ? असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे.सध्या मारेगावात कोणताही अंतर्गत संवाद नसलेली बेताल मंडळी काँग्रेसची धुरा वाहत आहे. बिनबुडाचे काही मोजकेच कार्यकर्ते केविलवाण्या परिस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्याचे सोंग करत आहे. पक्षाची प्रतिमा मलीन करीत आहे. काँग्रेसचे पट्टीचे नेते आणि हाडाचे कार्यकर्ते मात्र या यात्रेपासून गायब आहे हे येथे उल्लेखनीय.

मारेगाव तालुक्यात स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसचा प्रभाव आहे.कोलाम आदिवासी समाज आधीपासूनच “आमच्या इंदिराबाईचा पंजाच बरा” म्हणत कायम या पक्षाच्या पाठीशी होते. तालुक्यातील प्रत्येक गावातील दिग्गज व प्रतिष्ठीत माणूस काँग्रेस पक्ष कार्यासाठी झटत होता.बालगोपालही निवडणुकीत काँग्रेसचे बिल्ले अभिमानाने छातीवर लावीत खेळत होती.एकूणच संपूर्ण तालुका काँग्रेसमय होता.मात्र अलीकडेच “पैसे द्या अन् पद घ्या” हा अजब-गजब कारभार चव्हाट्यावर आल्याचे या पक्षात दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावान नेते व कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहे.यातूनच पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. वणी वरून आयात केलेले “सावकार छाप” आणि पोरखेळ मांडलेल्या एका थिल्लर कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये पॉकेट घेऊन पदाच्या दावणीला बांधण्यात आले.आणि येथुनच काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली.कोणताही जनसमुदाय नसणाऱ्या या बेताल सावकाराच्या वानर उड्या ने काँग्रेस बेजार झाली आहे. यामुळेच आता संपूर्ण तालुक्यात काँग्रेस लयास जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पक्ष कार्यापेक्षा केवळ बहुरुप्यासारखे सोंग उभे करणे व त्याचे फोटो प्रसिध्द करून घेणे एवढेच एक महान कार्य सध्या तालुक्यात सुरू आहे.यामुळे काँग्रेसची, गांधीवादी विचारधारा मानणारे प्रगल्भ नेते व निष्ठावान कार्यकर्ते या सर्व सोंगापासून चार हात दूर राहत आहे.त्यांची हौस फिटू द्या असे बोलत आहे.

हजारो कि.मी.पायदळ चाललेल्या राहुल गांधींनी प्रत्येक तालुक्यात , गावागावात पक्ष प्रसारासाठी जनसंवाद यात्रा काढण्याचे सुचविले होते.त्या अंतर्गत मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली.नुकत्याच झालेल्या या जनसंवाद यात्रेत थातुरमातुर पाच पंचेवीस माणसांना घेवून, टोप्या शेले घालून फोटोबाजी – नाटकबाजी करण्यात आली.

स्वतःशिच संवाद नसलेल्या छटाकभर लोकांची ही यात्रा लोंकासाठी ‘हास्यजत्रा’ ठरली.निष्ठावान नेते व कार्यकर्ते या यात्रेत कुठेच दिसले नाही.या यात्रेत काँग्रेसचे मातब्बर नेते व कार्यकर्ते का सामील झाले नाही.याची उलटसुलट चर्चा आता जिल्हाभर होत आहे.कॉग्रेस आता मारेगावातून संपण्याच्या मार्गावर आहेत की काय ? याचे खरे चिंतन करण्याची वेळ आली आहे. ढोंगी दिखाऊपणा केल्याने. नौटंकी करणाऱ्यांनी पक्ष वाढत नसतो. त्यासाठी घाम गाळावा लागतो. हा मुद्दा वरिष्ठांनी आता गांभीर्याने न घेतल्यास कांग्रेसचा हा किल्ला भुईसपाट होणार. त्याचे संकेत जाणवू लागले आहे. कांग्रेस ला याचे चिंतन करण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कांग्रेस चा कुणीच वाली उरणार नाही.

( उद्या वाचा : भाग २ मध्ये – मारेगाव बाजार समिती निवडणूक ठरली काँग्रेससाठी घसरपट्टी )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment