– मानवतेचे संस्कार : तालुक्यातील धर्माच्या भिंतींना छेद
मारेगाव : दीपक डोहणे
मुस्लीम धर्मात अल्लाहचे रूप निरंकारी व मूर्ती हा प्रकार निषिध्द असतांना मारेगाव येथील एक मुस्लीम युवक गेल्या पंधरा वर्षांपासून गणपती , दुर्गादेवी , शारदादेवी व लक्ष्मी देवीच्या मूर्तीला आकार देत सामाजिक अन धार्मिक एकोप्याच्या भाईचाराची प्रचिती देत एक महान आदर्श अविरत समाजासमोर ठेवत आहे.
मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील प्रभाग क्रमांक 12 मधील शाहरुख खॉंन महेबूब खॉंन पठाण हा 30 वर्षीय युवक गत पंधरा वर्षांपासून प्रस्थापित मानसिकतेला जबर चपराक देत गणपतीबाप्पा , दुर्गादेवी , शारदादेवी आणि लक्ष्मी मूर्तीं घडवतोय. विविधतेच्या एकतेने नटलेल्या स्वतंत्र भारतात हिंदू मुस्लीम ऐक्याचा घटना आणि विविधांगी प्रसंग अलीकडेच आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला बघतोय. मात्र मनात सामाजिक व धार्मिक वलय निर्माण झालेल्या शाहरुख खॉंन हा विविधतेने नटलेल्या परंपरेचे दर्शन घडवित आहे.
मारेगाव शहरातच नव्हे तर तालुक्यात गणेशोत्सव सर्वच जातीधर्मांना जोडून समाजाला एकसंघ करण्याचा इतिहास आहे.याचाच एक भाग शाहरुख खॉंन मारेगावात उजागर करतोय.ब्रिटिश विरोधात सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला व्यापक रूप दिले.सामाजिक एकोप्याची व मूर्ती घडविण्याची ही परंपरा मागील पंधरा वर्षांपासून शाहरुख खॉंन जपतो आहे.नव्हेतर भाईचाराची प्रचिती देत आहे.
आई वडील लहान भाऊ अन शाहरुख असं चौकोनी कुटुंब मारेगाव येथे वास्तव्यात आहे.शाहरुख अवघा दहावा वर्ग शिकून आठव्या वर्गात असतांना त्यास मूर्ती घडविण्याची कला अवगत झाली.पूर्वी घरासमोरच मूर्तीला आकार देत असतांना अपुऱ्या जागेमुळे तो आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये विनायक शतपलकर यांचे गोडाऊन मध्ये आकार देतोय.दरवर्षाला गणपती , दुर्गादेवी , शारदादेवी व लक्ष्मी च्या शंभराहून अधिकच्या मूर्ती बनवितो.
शाहरुख हा मारेगावात धर्माच्या भिंतींना छेद देत सामाजिक धार्मिकतेच्या ऐक्याचे प्रतीक बनला आहे.किंबहुना मूर्तीसह कुटुंबालाही आर्थिक आकार देतो आहे.शाहरुख खॉंन एकीकडे नमाजपठण करून मूर्तीला घडविण्याचे कार्य सामाजिक दृष्ट्या कौतुकास पात्र ठरत आहे.मानवतेचे संस्कार लाभलेल्या शाहरुख खॉंन पठाण सर्वधर्मसमभावाचे आदर्श उदाहरण धार्मिकतेचे तडे देणाऱ्यांना मोठी चपराक आहे.बहुदा शाहरुख भाईचाराची प्रचिती देत धार्मिक व सामाजिक सलोख्याचे हे मूर्तिमंत उदाहरण सॅल्यूट , नमस्कार अन सलाम साठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.