– मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील घटना
– उपचारासाठी नेतांना मृत्यू : आरोपी गजाआड
मार्डी : केशव रिंगोले
तालुक्यातील मार्डी येथील दोन अविवाहित युवकाचा बाजूला सरकण्याचा वाद जिवावर बेतून एकाने दुसऱ्यास चक्क कुऱ्हाडीने तब्बल 15 घाव देत हत्या केल्याची घटना बुधवारला रात्री 9 वाजताचे दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड दहशत आणि खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार , मार्डी येथील दारू दुकानात मदिराचे सेवन करीत असतांना प्रदीप गोविंद भारशंकर यास कैलास बंडू सोयाम याने बाजूला सरकण्याची सूचना केली.मात्र ही सूचना अपमानास्पद वाटल्याने या दोघांत शाब्दिक खंडाजंगी होत कैलासने प्रदीपच्या कानशिलात हाणली.आणि काहीवेळात हे दोघेही मार्डी येथील गजबजलेल्या चौकात आले.
दरम्यान , कैलास सोयाम हा मार्डी रस्त्यालगत असलेल्या एका पानटपरी शेजारी उभा असतांना प्रदीप भारशंकर याच्या मनात कानशिलात हाणल्याचा असंतोष खदखदत होता. प्रदीपने थेट घरी जावून कुऱ्हाड आणली आणि काही कळण्याच्या पूर्वीच कैलासच्या मानेवर , छातीवर व पाठीवर तब्बल पंधरा घाव दिले व कैलास हा घटनास्थळी निपचित पडला. या थरार घटनेने मार्डी येथे प्रचंड दहशत पसरून खळबळ उडाली आहे.
परिणामी , अवघ्या 22 वर्षीय कैलास सोयाम ( रा.मजरा ) हा रक्ताच्या थारोळ्यात पडून असतांना त्यास तात्काळ वणी येथे हलवितांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरोपी प्रदीप भारशंकर (रा.मार्डी ) हा घटनेनंतरही दहशत माजवित होता.पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहे.
दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी उजागर
हे दोघेही मिळेल ते काम करून नेहमीच ओल्या पार्टीचे दिवाने होते.आरोपी हा मूळचा वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील आहे. मागील दीड वर्षांपासून मार्डी येथे बस्तान मांडले.येथे जुगार मटका सह वेगवेगळ्या कामात पारंगत असल्याची माहिती आहे त्यावर यापूर्वी मारेगाव पोलिसांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.मृतक कैलास सोयाम हा बॅटरी , तार चोरी प्रकरणात यवतमाळ कारागृहात होता.तूर्तास तो जामिनावर होता. काल मार्डी येथील आठवडी बाजार असतांना त्याच्या जीवनात पुन्हा अघटीत घडले या क्राईम घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.