– एकाची इहलोकाची यात्रा तर दुसरा गंभीर
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यातील आत्महत्येची मालीका कायम असतांना सोमवारी मध्यरात्री गदाजी बोरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली तर म्हैसदोडका येथील युवा शेतकऱ्याने विषाचा घोट घेतला.त्याची प्रकृती गंभीर असून वणी येथील रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहे.
मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी येथील 48 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी महादेव भाऊराव बेंडे यांची वर्धा नदी व नाल्यालगत शेती आहे.गतवर्षीच्या व यंदाच्या पावसाने नदी नाल्याला पूर येवून शिवार पुर्णतः खरडून गेले.कर्ज काढून कशीबशी शेती उभारली मात्र हातचे पीक उध्वस्त झाल्याने जगण्याची विवंचना भेडसावत व शिरावर असलेल्या कर्जाने मन कलूषीत होऊन सोमवारला मध्यरात्री कौटुंबातील सर्वजन साखरझोपेत असतांना विष घेतले आणि घरातच गतप्राण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पश्चात आई , पत्नी व एक मुलगा व एक मुलगी आहे.
दरम्यान , दुसऱ्या घटनेत दोन दिवसांपूर्वी सकाळी 9 वाजताचे दरम्यान तालुक्यातील म्हैसदोडका येथील 22 वर्षीय युवा शेतकरी शुभम भाऊराव हेपट याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून निपचित पडला होता.
लगतच्या शेतकऱ्यास ही गंभीर बाब निदर्शनास येताच त्याला मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती अस्वस्थामुळे त्यास पुढील उपचारार्थ वणी येथे दाखल करण्यात आले आहे.
परिणामी , मारेगाव तालुक्यातील वाढत्या आत्महत्येने तालुका पुरता हादरून प्रभावित होत आहे.