– संडे स्पेशल
दीपक डोहणे : मारेगाव
अवघ्या तारुण्यात नवराबायकोच्या वाट्याला दुर्धर आजाराचं देणं.जिंदगीशी दोन हात करीत प्रारंभीचा काळ मिळेल ते काम करीत उमेदीच्या वयात नियतीने त्याचेवर अर्धांगवायू ची झडप घातली.एवढंच कमी म्हणून की काय ती मनोरुग्ण झाली.परिस्थिती नसल्याने आजारपण बोकाळला.त्याला व्यसन नसतांनाही तो आता एखाद्या तळीराम सारखा चालतो.कधी थांबतो.हातवाऱ्याचे बॅलन्स ठेवून चालण्याची स्पीड वाढते.रस्त्यावर चालतांना हे अभागी दृश्य पाहून अनेक वाहने त्याला वाट मोकळी करून देतात.मनोरुग्ण असलेली त्याची अर्धांगिनी एक दुजे के लिये म्हणत कशीबशी साथीला असते.मिळेल त्याला पाच दहा रुपये मागत त्यांचे हे मरणाचे जिणेच नव्हे तर चतकोरासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाचे विदारक वास्तव , वेदनेची अचूक नस पकडून जगण्याने पछाडलेल्या या दाम्पत्याची भयाण भळभळीत जखम अधोरेखित करण्याचा प्रयत्न “विटा” ने केला आहे.
मारेगाव तालुक्यातील अवघ्या दोन किमी.अंतरावर असलेले कान्हाळगाव. येथील पन्नाशी गाठलेला धम्मपाल नामदेव खोब्रागडे यास ऐन जीवनाच्या उमेदीत अर्धांगवायूने ग्रासले आणि त्याच्या धर्मपत्नी सुनिता मनोरुग्ण झाली.संसाराचा गाडा कसा हाकावा हा त्यांच्यासमोर यक्षप्रश्न. कुटुंबाची पुरती त्रेधातिरपीट उडाली असतांना जगणे च सतावणे आता त्यांच्या वाट्याला आले आहे.धम्मपाल यास काहीच करता येत नाही.त्यांचे मळकटलेले कपडे , वाढलेले केस आणि जगण्याचा संघर्ष.त्याला चालता धरता न येणारे त्याचे हातपाय.यातच पत्नी मनोरुग्ण.कधी एकदम अन अचानक गप्प तर कधी त्याला शिवीगाळ करीत जगण्याचा संघर्ष करताहेत.
घरकुल मिळालेल्या घराला घरपण नसल्याने साधी खाट , कपडे ,चादर त्यांच्या वाट्याला नाही.घरावरील भोके पडलेले टिनपत्रे, घरात ओलचिंब वातावरण , बंद पडले सिलेंडर , आर्थिक स्थितीने खंडीत झालेला वीजपुरवठा आणि एका कोपऱ्यात किर्रर्र रात्र काढण्याची त्यांची लगबगच नव्हे ते दरवाजा नसल्याने घर सताड उघडे आणि घरासमोरील केरकचऱ्याने भरलेले अंगण असं जीन त्यांच्या जगण्याचे भयाण वास्तव त्यांच्या वाट्याला. सकाळ उजाडली की एकदोन घरी जाऊन पोटाची खळगी भरायची आणि मारेगावात येऊन पाच दहा रुपये मागायचे हा त्यांचा दिन अन नित्यक्रम.
धम्मपाल यास गणगोत शून्य. आईवडील , बहीण भाऊ यांना नियतीने हिरावले आहे.तो आता कुटुंबात एकटाच त्यातच नशिबी आजारपण. गेल्या पंधरा वर्षांपासून आजाराशी दोन हात करतांना या दाम्पत्या च्या संसारवेलीवर अमन बाळ आता 14 वर्षाचा आहे.या दोघांचे गंभीर आजाराकडे पाठ फिरवून अमन ला मामाने चंद्रपूर जिल्ह्यातील गावी नेले.आता धम्मपाल व सुनिता आला दिवस समोर ढकलण्याचा प्रयत्न करताहेत.उपचाराची परिस्थिती नसल्याने आजाराशी संघर्ष करीत त्यांचे जगणे असह्य होत आहे.हेच त्यांच्या जगण्याचे प्राबल्य सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात पूरक ठरत आहे.
…तरच सामाजिक योगदान देणाऱ्यांचे जीवन कृतार्थ होईल
आजारी खोब्रागडे दाम्पत्याच्या जगण्याचा संघर्ष शब्दबद्ध करतांना आपण महान कार्यासाठी जन्माला आलो आहोत.अखिल मानव जातीच्या , समस्त विश्वाच्या कल्पनेचाही विचार करतोय.माणसात सेवाभाव जास्त असतो.तर मग या दाम्पत्यास काय योगदान देता येईल ही सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या संघटनेने आता पुढे सरसावण्याची गरज अनिवार्य झाली आहे.