– मारेगाव तालुक्यात ब्लॅक डायमंड..
मारेगाव : कैलास ठेंगणे
येथून तीन किमी अंतरावर असलेल्या साखरा (महागाव) तलावा नजीक काळ सोन म्हणून ओळखला जाणारा कोळशाचां साठा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे .
केंद्रीय कोल इंडियाच्या अधिनिस्त काम करणाऱ्या सी.एम.पी.टी.आय या खाजगी कंपनीने कोळशाचा शोध घेतला आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या मांगली ,साखरा, कोथूर्ला शिवारात काही दिवसापासून केंद्रीय कोल इंडियाच्या कंत्राटदारामार्फत कोळशाची चाचपणी सुरू आहे. सध्या मांगली व साखरा शिवारात बोरवेलच्या माध्यमातून कोळसा शोधला जात आहे.
अशातच साखरा शिवारातील महागाव सिंचन तलाव नजिक केंद्रीय कोल इंडियाच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सी.एम.पी.टी.आय खाजगी कंपनीने बोरवेल द्वारे कोळशाची तपासणी केली असता १५० मीटर अंतरावर कोळसा साठा असल्याचे संबधित कंपनीला निदर्शनास आले आहे. सदर कोळशाचा थर 18 मीटरचा असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबतचा अहवाल केंद्रीय कोल इंडियाच्या मंत्रालयातील विभागात सादर केला जाणार आहे. केंद्रीय कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती “विदर्भ टाईम्स” प्राप्त झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे.
सातत्याने कर्जाच्या कचाट्यात व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुवर्ण झळाळी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. तर दुसरीकडे शेत जमिनीचे दर चांगलेच वधारणार आहे. याबाबत मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
महसूल विभाग अनभिज्ञ
तालुक्यातील कुंभा महसूल मंडळात कोल इंडिया खाजगी कंपनीमार्फत कोळसा तपासात आहे. याबाबतची साधी कुणकुण सुद्धा महसूल विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन किती सजग आहे याची प्रचिती येत आहे.