Breaking News

मारेगाव तालुक्याला विळखा.. भाजपने फुकले अवैध व्यवसाय विरोधात रणशिंग

– रस्त्यावर उतरण्याचा गर्भित इशारा
– पोलिसात निवेदन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्याला अवैध व्यवसायाने चांगलाच विळखा घातल्याने येथील सर्वसामान्य जनता पुरता मेटाकुटीला आला आहे किंबहुना तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्याला प्रचंड धोका निर्माण होत असल्याने हे व्यवसाय तात्काळ बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा गर्भित इशारा मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने पोलिसात दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मारेगाव तालुक्यात शेकडो गावे संलग्नित असतांना बहुतांश गावांना अवैध व्यवसायाने कवेत घेतले आहे.मटका , जुगार , अवैध दारू विक्री , गोवंशाची तस्करी आदी व्यवसाय मारेगाव तालुक्यात राजरोसपणे सुरू आहे मात्र यात कारवाई शून्य असल्याने नेमके कुणाचे हात ओले होत आहे हे कुण्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज उरली नाही.परिणामी काही दिवसांपूर्वी रुजू झालेले ठाणेदार यांच्यापुढे आता अवैध व्यवसाय बंद करण्याचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

या अवैध व्यवसायाने मारेगाव तालुका कमालीचा ग्रासला आहे.नव्हेतर मारेगाव तालुक्यात होत असलेल्या नियमित आत्महत्या हेही अवैध व्यवसायाचे कारण ठरू पाहत आहे.नवयुवक दारू, मटका, जुगार च्या विळख्यात सापडला असतांना अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे.एकूणच तालुक्याच्या सामाजिक स्वास्थ्याला प्रचंड धोका निर्माण होत असतांना मारेगाव तालुका भाजप ने आता आंदोलनाचे हत्यार उपसण्याची व्युव्हरचना आखली आहे.

मारेगाव तालुक्यातील अवैध व्यवसायात लक्षणीय वाढ होत असतांना येत्या आठवडा भरात हे व्यवसाय कायम बंद करण्याची मागणी करीत पोलिसात निवेदन देण्यात आले.अन्यथा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचाही गर्भित ईशारा देण्यात आला.यावेळी पदाधिकारी सह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारेगाव तालुक्यातील अवैध व्यवसायाला अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अवैध व्यवसायावर कारवाई सुरूच असून यापुढे कारवाईचा बडगा आपण कायम ठेवणार असल्याचा आशावाद ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी “विटा” जवळ व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment