– तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन : काँग्रेसची मागणी
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
नियमित कर्ज भरणारे येथील सहकारी संस्थेचे सभासदच शेती कर्जापासून वंचित असल्याने त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले.
मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार यांचे नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यात 22 सहकारी संस्था असून 31 मार्च नंतर नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.मात्र तब्बल 144 सभासद अजूनही कर्ज उचल पासून वंचित आहेत.
दरम्यान , तालुक्यातील शेती हा मुख्य व्यवसाय असतांना शेतीला लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न सभासदांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप करण्यात आला.ऐन हंगामात कर्जापासून वंचित ठेवतांना शेतीचे संगोपन कसे करावे ही विवंचना 22 संस्थेच्या सभासदांना भेडसावत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जाची तात्काळ उपलब्धता करून देण्याची तसदी घेऊन सभासदांना शेतीपयोगासाठी दिलासा द्यावा अशी आर्जव मागणी तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनातून मारेगाव तालुका कांग्रेसने केली असून कर्ज उपलब्ध करून देण्यात विलंब झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य महिला पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.