खळबळजनक…मारेगावात मुसळधार पावसात अर्धनग्न आंदोलन

प्रभाग 3 व 4 मधील घरात पाणी घुसल्याने नागरिक आक्रमक

– नगरपंचायत प्रशासनाची यंदाही पोलखोल

मारेगाव :विटा न्यूज नेटवर्क

रात्री पासून सुरू असलेल्या पावसाच्या सातत्याने मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील रस्त्याचा अभाव आणि अरुंद गटारीमुळे घरात पाणी गेल्याने येथील नागरिकांनी भर पावसात अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

मारेगाव येथे नगरपंचायत प्रशासन अस्तित्वात आली तेव्हा पासून काही प्रभागातील विकासकामे आवासून उभे आहे.तळाला असलेल्या या प्रभागात रस्त्याच्या समांतर सिमेंट रोडची उभारणी करण्यात येऊन अरुंद गटारीचे कामे करण्यात आल्याचा येथील पिडीत नागरिकांचा आरोप आहे.

पावसाच्या सातत्याने पाणी बाहेर जाण्यास अडसर निर्माण झाला असून अनेकांच्या घरात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.नगरपंचायत प्रशासनास याबाबत यापूर्वी नागरिकांनी आर्त टाहो फोडला मात्र हा टाहो हवेत विरल्याने येथील नागरिकांसमोर नवे संकट उभे झाले आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्या तकलादू धोरणाविरोधात विजय मेश्राम , महेश जूनगरी , विकास गेडाम यांनी भर पावसात उभे राहून अर्धनग्न आंदोलनाची कास धरून प्रशासनाचे लक्ष वेधले.नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की , नगरसेवक नंदेश्वर आसुटकर , नगरसेवक जितेंद्र नगराळे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलन मागे घेण्याची विनवणी करीत आहे. मात्र कायमस्वरूपी ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा गर्भित ईशारा आंदोलनकर्त्याकरवी देण्यात आला आहे.

नगराध्यक्ष यांचेकडून आंदोलनाची दखल

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अर्धनग्न आंदोलनाची नगराध्यक्ष मस्की यांनी तात्काळ दखल घेत जेसीबी मशीन च्या सहाय्याने गटारीचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले.आंदोलन कर्ते भर पावसात आणि पाण्यात अर्धनग्न बसल्याने थंडीने कुडकुडत असतांना प्रशासनास तूर्तास निर्णय घेण्यास भाग पाडल्याची चर्चा प्रभागात रंगत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment