– दुकानाचा घाट..सर्वत्र संताप..!
– वादग्रस्त दुकानदाराचा डाव हाणून पाडण्यासाठी नागरिक रस्त्यावर
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नियोजित दारू दुकान सुरू करण्याचा घाट मांडला आहे. मार्डी येथील वादग्रस्त अनुज्ञप्ती धारक याने हे षडयंत्र आखले असून त्याचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी नागरिक सरसावले असून अर्ध नग्न आंदोलनाचा एल्गार डॉ.आंबेडकर चौकात पुकारला आहे.
मारेगाव प्रभाग क्रमांक 12 मध्ये बौद्ध , आदिवासी व अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे.नियोजित दारू दुकानाच्या हाकेवर बुद्ध विहार असून यामुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होण्याची संभाव्य शक्यता आहे.किंबहुना प्रभागातील युवती , महिलांचा कौटुंबिक व सामाजिक प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता बळावण्याची भिती व्यक्त होत आहे.
सदर दारू दुकानाचे नियोजन करणारा संचालक तालुक्यात वादग्रस्त आहे.त्याचेवर अनेक गुन्हे दाखल असल्याने भविष्यात हा प्रभाग नासवल्या जाणार असून ऐन धार्मिक स्थळाजवळ क्राईम घडण्याची भिती व्यक्त होते आहे.त्यामुळे नियोजित दुकान या प्रभागात नकोच अन्यथा कोणत्याही प्रसंगास समोर जाण्यासाठी येथील नागरिक आता आक्रमक होत रस्त्यावर उतरून प्रशासनास जाब विचारणार आहे.
नियोजित दारू दुकान विरोधात आंदोलनाचा एक भाग म्हणून येथील नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले असून प्रशासनाकरवी ठोस पावले उचलत नाही तोवर आंदोलनाची धग तेवत ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
आंदोलनात मारेगाव येथील सर्वश्री विलास रायपूरे , गजानन चंदनखेडे, चांद बहादे, आकाश भेले, ज्ञानेश्वर धोपटे , अनिल गेडाम , हेमंत नरांजे , आकाश खामनकार, पंकज साठे , गोलू कोवे, विजय खाडे , प्रकाश रायपूरे यांचेसह उदय रायपूरे , दीपक डोहणे ,संतोष रोगे सह महिला आंदोलनात सहभागी झाले आहे.आंदोलन नेमके कोणते वळण घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.