– मारेगावात द्वेषपूर्ण वागणुकी विरोधात काष्ट्राईब संघटनेचे धरणे आंदोलन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येथील शिक्षण विभागच मानवी कटुतेने पुरती वादात सापडली आहे. अधिकाऱ्याच्या जुजबी भूमिकेच्या विरोधात काष्ट्राईब शिक्षक संघटनेने शंडू ठोकून प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांचेवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू होणार आहे.त्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात चक्क प्रभारी गट शिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांच्या वादग्रस्त भूमिकेने द्वेषपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर येत संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले.
पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलनात शिक्षक व काष्ट्राईब संघटनेचे काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे , राज्य कार्यकारिणी काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे सदस्य किरण मानकर यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील बेताल भूमिकेचा खरपूस समाचार घेत ‘प्रभार’ निघणार नाही तोवर संघटना स्वस्थ बसणार नसल्याचा गर्भित इशारा दिला.
दरम्यान , आंदोलन स्थळाला गटविकास अधिकारी पद्माकर मडावी , विस्तार अधिकारी जानराव शेडमाके , अधीक्षक अनिल राऊत , सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय वानखेडे यांनी भेट दिली.आंदोलन कर्त्यांशी चर्चेअंती गटशिक्षणाधिकारी यांचे एकेक संतापजनक पैलू कथन करण्यात आले. सदर प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात येऊन तात्काळ अहवाल प्राप्ती नंतर आपण योग्य निर्णय घेण्याचे आंदोलनकर्त्यास आश्वस्त केले.
परिणामी , चालू आठवड्यात ‘प्रभारावर’ कारवाई न झाल्यास जिल्हास्थळी आंदोलनाची धग तेवत ठेवून आंदोलन उग्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.