– टेबलखुर्ची चा वाद आला चव्हाट्यावर
मारेगाव : कैलास ठेंगणे
जिल्हा परिषदेच्या मारेगाव पंचायत समिती मधील शिक्षण विभाग सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासह पगार बिल ,निवृत्तीवेतन ,शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना डावलणे आदीसह विविध गंभीर स्वरूपाचे आरोप कास्ट्राईब शिक्षक संघटनेनी केलें आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या मागे चौकशीचा सेसेमीरा लागला असला तरी तालुका मुख्याध्यापक संघाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे तालुका शैक्षणिक विभागामध्ये विविध चर्चेला उधाण आले असले तरी बिईओ तूर्तास हो नाही च्या कात्रीत सापडले आहे.
मारेगाव पंचायत समितीमधील शिक्षण विभागामध्ये राजकारणाचा शिरकावर नवा नाही. शिक्षकांच्या विविध संघटना शिक्षण विभागावर दबाव तंत्राचा वापर करून आपले इप्सित साध्य केल्याचे अनेक उदाहरणं आहेत. किंबहुना ही ओरड ही सर्वश्रुत आहे.त्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांना संघटनेच्या शिक्षकांना हाताशी धरून शिक्षण विभागाचा गाडा हाकवा लागतो हे ही तेवढेच सत्य. मात्र मारेगाव पंचायत समितीला प्रभारी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार रुजू झाल्यापासून शिक्षण विभागाने कात टाकली होती.
तालुक्यातील विविध शाळांना अकस्मात भेटी देणे, विद्यार्थ्यांशी हितगुज साधने, विद्यार्थ्यांना पोषण आहार सोबत पूरक आहार मिळतो की नाही याची खात्री करणे, शिक्षक शाळेत नियमित वेळेवर येते की नाही हे तपासणे, विद्यार्थ्यांकरिता खेळांच्या स्पर्धा आयोजित करून स्वतः हिरीरीने हजर राहणे आदी विषयाला त्यांनी चांगलाच हात घातला होता. त्यामुळे त्यांच्याप्रती शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आवळला जायचा. मात्र अवघ्या एक महिना सेवानिवृत्तीला बाकी असताना तालुका कास्ट्राईब संघटनेने प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर पुराव्यानिशी गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने एकच खळबळ माजली. मागासवर्गीय शिक्षकांना अपमानजनक वागणूक देणे, वेतन वाढ थांबविणे, निवृत्ती पेन्शन पासून वंचित ठेवणे, पदोन्नती थांबविणे, विस्तार अधिकाऱ्यांना शिक्षण विभागापासून चार हात लांब ठेवणे आदी स्वरूपाचे गंभीर आरोप आहे. तर मारेगाव पंचायत समिती समोर तीन जुलैपासून धरणे आंदोलनाचे हत्यार सुद्धा उपसले असतांना तालुका मुख्याध्यापक संघाने यात उडी घेत प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या समर्थनार्थ गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, निस्वार्थी गटशिक्षणाधिकार्यावरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तालुका शिक्षण विभागातील आरोप प्रत्याआरोपाकडे तालुकावासीयांचे यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील शैक्षणिक प्रगती करिता मी काम करीत आहे. शाळांची नियमित तपासणी करीत असताना काही शिक्षकांना त्रुटीचा शेर आवडत नाही. कोणाबद्दलही द्वेषभाव ठेवला नाही. काहीनी दूषित भावनेतून माझ्यावर बिनबुड्याचे आरोप केले आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी
नरेंद्र कांडूरवार, मारेगाव
आमची संघटना मागासवर्गीय शिक्षकांकरिता काम करते. शिक्षकावरील अन्यायकारक वागणूकला वाचा फोडणे आमचे काम आहे. आम्ही सामान्य न्यायाची अपेक्षा करतो.
धर्मराज सातपुते
अध्यक्ष, तालुका कास्ट्राईब संघटना
शिक्षण विभागाला गती देणारे, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक ,निस्वार्थी असे उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी अनेक चांगले बदल शिक्षण विभागात केलें. काही चुकीच्या प्रवृत्ती त्यांच्या विरोधात तथ्यहिन आरोप करीत फिरत आहे.
तालुका मुख्याध्यापक संघ
अध्यक्ष सुधाकर काळे