मारेगाव शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात..  बहुचर्चित प्रभारी गट शिक्षणाधिकारीच्या ‘प्रभारा’ वर हातोडा मारा

– मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना द्वेषपूर्ण वागणूकीचा आरोप

– शिक्षण विभागातून मागासवर्गीय अधिकाऱ्यांची टेबलखुर्ची इतरत्र हलविली

– काष्ट्राईब संघटनेचा आंदोलनाचा एल्गार

मारेगाव : दीपक डोहणे

प्रशासकीय कामकाजात अधिनस्थ असलेले येथील प्रभारी गट गटशिक्षणाधिकारी यांच्या मनात जातीयतेच्या भोवरा फिरून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याने त्यांचा प्रभार तात्काळ काढण्यात यावा अशी आर्जव मागणी मारेगाव तालुका काष्ट्राईब संघटनेने केली आहे.तशा आशयाची तक्रार वरिष्ठांकडे पाठविण्यात आली असून या मागणीसाठी आता आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे.

 

मारेगाव पंचायत समिती अंतर्गत प्रभारी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार मागील वर्षभरापासून या ना त्या कारणाने बहुचर्चेत आहे.मागासवर्गीय शिक्षक व कर्मचाऱ्यांना हीन वर्तवणुकीचा पाढाच या प्रभारी बी.ई.ओ .ने पाठ केला आहे.त्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या समान वागणूकीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागात जातीयतेचे भूत मानगुटीवर बसल्याने नानाविध चर्चेला उधाण येत संबंधित बी.ई.ओ. प्रती सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे.

मागासवर्गीय अधिकारी यांचे टेबल खुर्ची दालनातून हलविले

 

येथील शिक्षण विभागात कार्यरत गटशिक्षणाधिकारी कांडूरवार यांच्या अधिनस्थ असलेले मागासवर्गीय विस्तार अधिकारी रामटेके यांचे शिक्षण विभागाच्या दालनातूनच टेबल खुर्च्या इतरत्र हलविण्यात आल्या. यापूर्वी कधीच न हललेल्या टेबल खुर्च्यांना आत्ताच का जाणीवपूर्वक पाय फुटावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर दुसरे विस्तार अधिकारी शेडमाके यांना आजतागायत या दालनात प्रवेश न देता बीआरसी विभागात अडगडीत ठेवण्यात आले. कोणत्याही शैक्षणिक व निर्णायात्मक धोरणातूनही बगल देण्यात येत आहे.शेडमाके यांचेकडे गटसमन्वयकचा प्रभार ही अलगद काढण्यात आला. परिणामी , आपल्या कामकाजात मागासवर्गीय अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढू नये. हे लोकं आपल्याकडून सुरक्षित अंतर ठेवून रहावे या जंग चढलेल्या बेताल मनोवृत्तीचा येथे तंतोतंत कयास लावल्या जात आहे.

इतरांना मुभा , मागासवर्गीय शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रयत्न

 

बोटोणी येथील शिक्षिका उषा भगत यांचे तब्बल दोन वेतन वाढ थांबविण्यासाठी शेरा अग्रेषीत करण्याची कसरही प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी सोडली नाही.किंबहुना त्यांच्या पेंशन निवृत्तीचा अहवालही पाठविण्याची तसदी घेण्यात आली नाही.बी.ई.ओ.च्या हेकेखोर प्रवृत्तीने ‘त्या’ शिक्षिकेचे मानसिक संतुलन लयास जात आहे.एवढेच नव्हेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुते यांचेवर जादा शोधन प्रवृत्तीचा हप्ता वसुलीसाठी अनेक शिक्षक प्राप्त असतांना केवळ सातपुते यांना हेतुपुरस्सर नोटीस पाठविण्यात आली. नुकत्याच झालेल्या मुख्याध्यापक पदोन्नतीत गोपनीय अहवाल देण्यात मनोहर भेले यांना जाणीवपुर्वक मानसिक त्रास देण्यात येत आहे.मात्र मर्जीतील काही संघटनेच्या शिक्षकांना यातून सपशेल सूट देण्यात येऊन हे महाशय आपुलकीचा आव आणत आहे. यात प्रामुख्याने मागासवर्गीय अधिकारी , शिक्षक यांनाच या भेदभावेच्या नाहक त्रासाला समोर जावे लागते आहे.मात्र यात मागासवर्गीय व्यतिरिक्त इतरांना सोयीस्कर मुभा देण्यात येत असल्याचा आरोप काष्ट्राईब संघटनेकडून करण्यात आला.

एकुणच प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या जातीय दृष्टिकोन भूमिकेने वेगवेगळ्या तर्काला उधाण येऊन संताप व्यक्त होत आहे.द्वेषमूलक भावनेने प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या बहुचर्चित प्रभारी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचा प्रभार तात्काळ काढण्यात यावा अशा आशयाची तक्रार वरिष्ठांकडे देण्यात आली असून येत्या 3 जुलै ला मारेगाव तालुका काष्ट्राईब संघटनेकडून पंचायत समिती समोर प्रभार काढण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment