Breaking News

अपघात अपडेट… क्रूर नियतीने केले चार पाखरांना पोरके

एकाच वेळी निघाल्या चौघांच्या प्रेतयात्रा : पंचक्रोशी वेदनेने हळहळली. 

– मायबाप कायमचे विसावले

मारेगाव : दीपक डोहणे

रफीक अन युसूफ हे दोन सख्खे भाऊ.वेगवेगळ्या व्यवसायात छाप उमटविले.दोघांच्या कुटुंबात कायम एकोपा. ते जीवनाची चाके पुढे हाकत असतांना दोन भावासह दोन जावांवर क्रूर नियतीने झडप घातली. काल शुक्रवारी चंद्रपूर येथून परत निघतांना त्यांच्या बेलोरा वाहनाचा चिंचाळा गावाजवळ अपघात होऊन क्षणात चौघे बळी ठरले.पंचक्रोशीला हादरवून सोडणाऱ्या या घटनेने एकाच वेळी चौघांच्या प्रेतयात्रेने मारेगाव हादरले. चार पाखरांचे मातृपितृ छत्र कायमचे विसावले.सर्वांचे मन हेलावून सोडणाऱ्या या दुर्देवी घटनेने सारेच गहीवरले. जड अंतःकरण , मनातील हुंदके आणि अश्रूंना वाट मोकळी करीत शेकडोंनी शेख कुटुंबातील मायबापांना अखेरचा ‘सलाम’ केला.

रफीक अन युसूफ हे दोघे भाऊ.सामाजिक , राजकीय आणि क्रीडा विश्वाची बांधिलकी जपत गोतावळ्याची घट्ट मूठ बांधली.रफीक भाई ऑटोमोबाईलचा व्यवसाय तर युसूफ भाई थंड पेयाची एजन्सी सह शेती या मुख्य व्यवसायावर कमालीचा भर देत जीवनाचा गाडा हाकत होते.रफीक भाई ची पत्नी संजीदा सोज्वळ स्वभावाची गृहिणी तर युसूफभाई ची अर्धांगिनी किलबिल करणाऱ्या बालकांना घडविण्याचे कार्य अर्थात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती.

पण क्रूर नियतीने थट्टा करीत चार पाखरांना आता मायबाप पासून पोरके केले.रफीक भाई यांचा जावेद हा मुलगा मुंबईत अभियंता तर मुलगी मुस्कान ही चंद्रपूर येथे एमबीए करतेय.युसूफभाई यांची मुलगी सानिया ही नीट ची तयारी करीत आहे तर दुसरी मुलगी तंनवूर ही बी फॉर्म करतेय.

हे चौघे कुटुंबातील प्रमुख गुरुवारला राजुरा येथील कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते.परतीच्या प्रवासात युसूफभाई यांचे सासर असलेल्या बल्लारपूर येथे काही वेळ घालवित पडोली मार्गे प्रस्थान करीत असतांना चिंचाळा गावाजवळील दुभाजकावर त्यांचे वाहन गेले अन अघटीत घडत चौघेही जागीच गतप्राण झाले आणि मारेगावकर शोक सागरात बुडाला.सर्वांच्या नजरा शून्यात असतांना त्यांच्या राहत्या घरी मानवी थव्याची रिघ लागली.काय झाले..कसे झाले..हे नेहमीचे बोलके शब्द काही वेळासाठी मुके ठरत असल्याचा प्रत्यय सर्वांच्या मनाला चिडफार करीत होता.रात्री 9.30 वाजता चौघांचे मृतदेह मारेगावात दाखल होताच एकच हंबरडा फुटून सर्वांच्या नजरा शून्यात खिळत असतांना त्या क्रूर नियतीपुढे मारेगावकर पुरते गहिवरले ! नियती पुढे सर्वच नागरिक मनातून आर्त हुंदके देत होते. एकाच वेळी चार तिरडी बघून महिलांनी एकच आक्रोश केला. आसमंत ही रडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment