– मारेगाव तालुक्यात बळीराजा हवालदिल
मारेगाव : कैलास ठेंगणे
पाऊस हे सृष्टीचे लेणं असल्याने निसर्गसौंदर्य खुलून जाते. आजकाल निसर्ग लहरी बनल्याने ऋतुचक्र उलटे फिरू लागले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन संपण्याचा वेळ येत असताना मृगधारा बरसण्यास तयार नाहीत. पाऊस रूष्ठ झाल्याने बळीराजाचे स्वप्न होरपळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तहानलेल्या, आसुरलेल्या डोळ्यात जीवनाचा मेघ होऊन तू प्रगट व्हावे. वर्षा ऋतुचा रंगावा आगळावेगळा सोहळा. बरसावा या शिवारी मेघ सावळा काजळा अशी याचना चिंताग्रस्त शेतकरी वरून राजाकडे करीत असल्यास दिसून येत आहे.
मारेगाव तालुक्यात पावसाची सरासरी ही 1000 मिलिमीटर पेक्षा जास्त आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून कमी अधिक पडत आहे. बागायती क्षेत्र कमी असल्याने बहुतांशी शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याची स्थिती सध्या तरी दिसून येत नाही.
येणाऱ्या काळात स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रयत्न केल्यास नक्कीच तालुका सुजलाम सुफलाम होईल. सध्या मात्र सिंचनाची वानवा आहे.
यंदा उन्हाळ्यात जणू पावसाळा अनुभवास मिळाला. ऋतुचक्र कुस बदलत असल्याने त्याचा मोठा फटका शेती व्यवसायावर बसतो.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्व पावसाळी कामे आठवून खरिपाची तयारी केली. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. आता मृग नक्षत्र सुरू होऊन संपायला चार दिवस बाकी असताना पावसाचा थांगपत्ता नाही. दरवर्षी निमंत्रण दिल्यागत येणारा वरून राजा आज घडीला कावराबावरा झाल्याने वाटेल तेव्हा बरसतो आहे. अवेळी धिंगाणा घालणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडत आहे. त्यामुळे मृगस सरी कधी बरसणार याकडे शेतकऱ्याच्या नजरा लागल्या आहे.
कापूस लागवड क्षेत्रात वाढ
कपाशीच्या दरात चढ उतार होत असताना तसेच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पसंती दिली आहे. यंदा तालुक्यात 39560 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने कापूस 33 हजार , सोयाबीन 6 हजार तर तुर 560 हेक्टर वर लागवड होण्याची शक्यता आहे.