– वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कामकाजावर सदस्यांचा बहिष्कार
– इन मीन तीन जणांचा ग्रामपंचायत मध्ये बोलबाला
मारेगाव : दीपक डोहणे
विकास कामाच्या नावाने उखळ फोडणाऱ्या मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील खर्चित रकमेचा हिशेब आणि इतर सदस्यांना विश्वासात न घेता खर्च करणाऱ्या सरपंच उपसरपंच यांच्याविरोधात एल्गार पुकारून ग्रा.पं. कामकाजावर तब्बल सात सदस्यांनी बहिष्कार घातल्याने प्रशासनाने पूर्वसूचना म्हणून नोटीस बजावली आहे.तब्बल अकरा महिन्याच्या कालावधी नंतर प्रशासनास जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिंचमंडळ येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असलेली या ना त्या कारणाने नेहमीच विशेष चर्चेत असते.मागील अनेक महिन्यापासून मासिक सभेची येथील ग्रा.पं. सदस्यांना नोटीस न देता लाखो रुपयांची उचल होत असल्याचा आरोप आहे.इन मीन तीन जनात हा अर्थव्यस्थेचा खेळ बिनधास्त सुरू असल्याची ओरड आहे.याबाबत वरिष्ठांना अवगतच नाही तर उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतरही जिल्हा स्थळावरून चौकशीचे आदेश आले मात्र चौकशी थंडबस्त्यात आहे.याच विरोधात सहा सदस्यांनी दंड थोपटून प्रशासनाच्या बेताल वर्तवणुकीचा परिपाक म्हणून कामकाजावर बहिष्कार टाकलाय.तब्बल अकरा महिन्यापासून ही बहिष्काराची मालिका सुरू असतानाच प्रकरण अंगावर शेकण्यापूर्वीच बहुचर्चित सचिवाची उचलबांगडी करण्यात आली.
रुजू झालेले ग्रामसेवक म्हणून मानकर यांनी पदभार स्वीकारत सात सदस्यांची संमती नसतांना परस्पर ठराव घेत बँक खाते उघडण्यात कसर सोडली नाही. सात सदस्य एका बाजूला असतांना पाणी पुरवठा , पंधरावा वित्त आयोग , सामान्य फंड चे देयके काढून सरपंच उपसरपंच व सचिव यांनी लाखो रुपये खर्चित केल्याचा आरोप सदस्या कडून करण्यात येत आहे.
या सात सदस्यांना नोटीस बजावल्या
ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत असंतुष्ठ असलेल्या सात सदस्यांनी मागील अनेक महिन्यापासून कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.त्यांचे सदस्यपद रद्द होऊ शकते अशा आशयाच्या प्रशासन कडून नोटीस निर्गमित करण्यात आल्या असून यात वंदना सुरेश दानव , कविता भास्कर पालकर , अर्चना वामन चटकी , भाग्यश्री दिवाकर सातपुते , नामदेव धोंडू नाहे , वैभव भास्कर सोनटक्के , रामदास गणपत चौधरी यांचा समावेश आहे.
कुणाचे पद हिरावून घेण्याचा प्रयत्न नाही मात्र प्रशासकीय कामकाजात नियमितता असली पाहिजे. त्यासाठीच पूर्वसूचना म्हणून नोटीस हा एक पर्याय ठेवला असून यासाठी सदस्यांनी मिटिंग व इतर कामात हस्तक्षेप करून ग्राम पातळीवरील विकास साधावा.
-ए.एस. मानकर, सचिव