Breaking News

मारेगाव तालुक्यात कांग्रेस मध्ये…. कुछ तो गडबड है दया…!

– बाजार समिती ने मांडला राजकीय कुरघोडी चा बाजार

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव कांग्रेस मध्ये सध्या वरून ‘कीर्तन अन आतून तमाशा’ असा असंतोष घोंगावत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकीत कांग्रेस मध्ये मोठे महाभारत घडले. यात ऐन वेळी आयत्या बिळात नागोबा घुसला. यामुळे अनेक जुने जाणते नेते, सहकार क्षेत्रातील टोपी वाले नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उठवत आहे. किती भेटले जी ?….असा थेट सवाल देखील विचारण्यात आला.

मारेगाव हा पूर्वीपासून कांग्रेस चा बालेकिल्ला आहे. अनेकांनी काँग्रेस मध्ये सतरंज्या उचलणे, धावपळ करणे यासाठी आयुष्य वेचले. पण मागील चार पाच वर्षांपासून पक्षातून सेवाभाव गेला. मोठी दुकानदारी सुरू झाली. पैसे द्या अन पद विकत घ्या असे “वरोरा पॅटर्न” ने धुम केली. यातून नाक पुसायची लायकी नसलेले “पोष्टर छाप” नेते कांग्रेस मध्ये सूज आल्यासारखे उभारून येत आहे. पाच पंचवीस टपोरी पोरं घेऊन, तमाशे करून, पैसे फेकुन, सेटिंग लावून आता कांग्रेस नेता होण्याचे प्रकार या पक्षात सुरू झाल्याचे दिसत आहे.

नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांग्रेस अंतर्गत खूप घमासान झाले. दिग्गज व अनुभवी नेत्यांना फाट्यावर ठेवून शेलक्या नेत्यावर मर्जी बहाल करण्यात आली. यामुळे आता कांग्रेस मध्ये मोठी दुफळी निर्माण झाली. दबक्या आवाजात अनेकजण आपली नाराजी व्यक्त करीत आहे. नसलेल्याना देव बनवावं अन आम्ही त्याला हात जोडावे हे कसे ? असा प्रश्न विचारला जात आहे. पुढील निवडणुकीत त्या गावपाटीलकी करणाऱ्या नेत्याला चांगलाच ‘हात’ दाखविण्याची आत्तापासूनच रणनीती आखण्यात येत आहे.याचा प्रत्यय खरेदी विक्री पणन महासंघावर प्रतिनिधी निवडणूकीतही दिसून आला.

मारेगाव काँग्रेस पक्ष प्रामुख्याने सहकार क्षेत्रात मजबुतीने पाय रोवून आहे.पक्षात मात्र एकजुटीचा प्रयत्न नेहमीप्रमाणे निष्फळ ठरत आहे हे त्रिवार सत्य.अशातच पक्षात एका गटाचा इगो दुसऱ्या गटाला भारी पडतांना दिसत आहे.राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या अनेकांचा बाजार समिती निवडणूकीतील हिरमोड आता एका नेत्याच्या पथ्यावर पडणार आहे.

दरम्यान , शेतकऱ्यांची असलेली बाजार समिती निवडणुकीत दिग्गज संचालकांची प्रमुख सभापती पदावर वर्णी लागेल असा अंदाज होता.पक्षासाठी अख्ख आयुष्य वेचणाऱ्याला व पक्षनिष्ठ राहिलेल्यांना सन्मानपूर्वक खुर्ची मिळेल हा कयास होता.किंबहुना शेतकरी वा त्याच्या पुत्राला या पदावर बसविण्याची आग्रही भूमिका अनेकांची होती.मात्र तसे न होता शेतकऱ्यास व अनुभवी निष्ठावान यांना डावलून ऐनवेळेस दुसऱ्याचे नाव लादल्याने प्रचंड नाराजी आजतागायत खदखदत आहे.परिणामी यास कारणीभूत ठरलेल्या एक टोपीवाले नेता आता निष्ठावान कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर आहे.बाजार समिती सारखीच राजकीय पोळी शेकण्याच्या पुन्हा प्रयत्न झाला. अविरोधचा फार्मूला पणन महासंघ प्रतिनिधी निवडण्यावर झाला. मात्र कमालीचे नाराज निष्ठावान यांनी ही निवडणूक एकाच पॅनलचे प्रतिस्पर्धी उमेदवार देऊन त्या नेत्याला जोर का झटका दिला. स्पर्धा बरोबरीत आणली आणि ईश्वर चिठ्ठीने गणपत ढवस विजयी झाले हे येथे विशेष.

बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची पक्षात ओरड आहे. नेत्यापासून तर संचालक मस्त ओले चिंब झाले अन सभापती साठी मुंग गिळुन चिडीचूप झाले.मात्र यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली.आता या पक्षात दुफळी माजत आहे.त्यामुळेच येणाऱ्या काही महिन्यात अविश्वासाचे हत्यार उपसले गेले तर आश्चर्य वाटता कामा नये.

मात्र यातून एका नेत्याला आता खड्यासारखा उचलून भिरकविण्याचा प्रत्यय आगामी काळातही होणार असल्याची चर्चा सुरू आहे. “कुछ तो गडबड है दया…” सारखे येणाऱ्या दिवसात कांग्रेस मध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे.

पक्ष निष्ठा म्हणून दिवस रात्र मेहनत करायची.आणि ऐनवेळी वरिष्ठांकडून उसने नेतृत्व आणून बसवायचे याला काय म्हणावे..? यातून आता पुढे फुंकून राजकारण करावे लागेल एवढा अनुभव आला
-अरुणाताई खंडाळकर
जेष्ठ काँग्रेस नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सभापती

बाजार समितीच्या मुख्य पदावर खरा शेतकरी बसायला पाहिजे होता.पक्षाच्या निष्ठेने आम्ही लढलो.मात्र पूर्वनियोजित कटाने हे पद लादल्या गेलं.या निवडणुकीपासून काही नेत्यांचे तत्व पटत नाही आहे.यापुढे अलिप्त राहू नाहीतर तत्वाशी तडजोड न करता वेगळ्या भूमिका घेवू. हा येणारा काळ ठरवेल*.
वसंतराव आसुटकर
संचालक कृ. ऊ. बा. समिती तथा माजी उप सभापती , मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment