Breaking News

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाचा फज्जा

– उद्घाटन ठरले नावापुरते
– स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

मारेगाव : कैलास ठेंगणे

मृदू व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात सर्वत्र गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना धुमधडाक्यात राबविण्यात येत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यातील कुंभा परिसरातील महागाव लघु सिंचन तलावातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा पुरता फज्जा उडाला. उद्घाटन करून पंधरा दिवस लोटले असताना अजून पर्यंत एकही ट्रॅक्टर गाळ धरणाबाहेर निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो.
सध्या सर्वत्र गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना धुमधडाक्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागामार्फत ही योजना कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पूर्णस्थापित करणे तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची पत सुधारुन शेतकऱ्याचा उत्पन्नातही वाढ होईल. असा हेतू असताना स्थानिक प्रशासनाला मात्र याचा पुरता विसर पडले चित्र बघायला मिळत आहे.
मारेगाव तालुक्यातील महागाव(शिंदी) लघु सिंचन तलावातील गाळ उपसण्याचे नियोजन जिल्हास्तरीय समितीमध्ये करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने 18 मे रोजी उपविभागीय अधिकारी, प्रभारी तहसीलदार व लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी थाटामाटात उद्घाटन उरकले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यापूर्ती व फोटोसेशन करिता जेसीबी व ट्रॅक्टर उभे केले. हे विशेष.
आज, उद्याला गाळ काढणे सुरू होईल ही भाबडी अशा शेतकरी बाळगत होते. मात्र तब्बल पंधरा दिवस लोटूनही गाळ काढण्यासाठी प्रशासना करावी कुठलीही हालचाल होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे उरकून टाकली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या आशा आता मावळल्या.

खाजगी संस्थेने दाखविला ठेंगा
सदर तलावातील गाळ काढण्याचे काम वणी येथील एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. सदर संस्थेने स्थानिक पातळीवर प्रचार प्रसार करणे .शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेणे. त्याचबरोबर तलाव परिसरात जेसीबी मशीनद्वारे गाळ उपलब्ध करून देणे. आदी कामे संस्थेवर होती. मात्र संस्थेने या कामाकडे साफ दुर्लक्ष केल. व त्याचबरोबर अधिकाऱ्यांना चुकीची माहिती पुरवली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सदरचे काम एका खाजगी संस्थेला दिले आहे .मी या संदर्भात संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाला सुरुवात करायला लावतो.
-प्रशांत कदम
उपविभागीय अभियंता
लघु पाटबंधारे विभाग

मी माझ्या शेतात गाळ टाकण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्याशी बोललो. मात्र अजून पर्यंत त्यांनी मशीन उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आता शेतीची मशागतीची कामे सुरू केली असल्याने गाळ आता टाकने शक्य नाही.

-विजय बोथले 

शेतकरी कुंभा

प्रशासनाने थाटामाटात उद्घाटन केले .त्यानंतर स्थानिक प्रशासनाने याकडे ढुंकुनी पाहिले नाही . आता पावसाळाचे दिवस आहे. त्यामुळे शेतकरी गाळयुक्त शिवारापासून वंचित राहिले आहे.

-नीलिमा थेरे
सरपंच शिंदी (महागाव)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment