Breaking News

धिरगंभीर.. – हात कटलेला माझ्या बाळास कोणी जगण्याचे बळ देणार का?

मारेगाव जिनिंग मध्ये अपघातग्रस्त राजुच्या आईचा आर्त टाहो
– जन मदतीचे सोंगाडे हात वर

मारेगाव : दीपक डोहणे

तो नवयुवक होता उमदा कामगार. सर्वांना भुरळ पडेल असे त्याचे निखळ सौंदर्य.पण गरीब बिचारा पोटाची खळगी भरण्यासाठी तो उत्तर प्रदेश मधून थेट मारेगावच्या वसंत जिनिंग मध्ये कामगार म्हणून रुजू झाला.आणि त्याच्या जीवनात अघटीत घडले.थेट प्रेसिंग मशीन मध्ये सापडून त्याचा खांद्यापासून हात चेंदामेंदा होऊन वेगळा झाला.मात्र तब्बल दोन महिने हा भयानक प्रकार गुपचूप दडवून ठेवला.पण हा गंभीर अपघात आता वेगळ्या वळणावर आहे. स्वतःला महान समाजसेवक दाखविनाऱ्याने राजुला मदतीपासून कोसो दूर ठेवले.आता माझ्या वीस वर्षीय बाळाचं काय होणार असा आर्त टाहो राजूची आई फोडते आहे.

मारेगाव येथील वसंत जिनिंग मध्ये राजू चव्हाण या वीस वर्षाचा कामगार कार्यरत होता. तिथे सलग 24 तास ढोरासारखा राबल्याने 4 मार्च रोजी त्याचा हात मशीनमध्ये कटुन खांद्यापासून वेगळा झाला.रक्तबंबाळ अवस्थेत त्याला गुपचूप मारेगाव रुग्णालयात दाखल केले गेले.या गंभीर प्रकरणाची माहिती मात्र पोलिसात दिली नसल्याने संबंधित जिनिंग कंत्राटदार याचा खरा हेतू संशय निर्माण करीत आहे.नेहमी मदतीचा बागुलबुवा अन् सोंग उभा करणाऱ्या कंत्राटदाराने यात अनेक गंभीर व चुकीचे प्रकार केले.

कोणत्याही फॅक्टरी मध्ये मानवी अपघात घडल्यास शासनाच्या कामगार अधिकारी यांना 24 तासात कळविणे आवश्यक आहे. मात्र हे प्रकरण दाबण्याचे प्रकार घडले. फॅक्टरी ॲक्ट नुसार सुद्धा अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागते.मात्र ही माहिती देण्यात आली नाही. वसंत जिनिग चे संचालक मंडळ हेही या अपघात पासून अनभिज्ञ होते. मारेगाव ग्रामीण रुग्णालय चे डॉक्टर यांनी या अपघाताची एम. एल. सी.रिपोर्ट पोलिसांना पाठविली की नाही ही प्रश्न अनुत्तरित आहे. जर डॉक्टरांनी रिपोर्ट पोलिसांना पाठविली असेल तर पोलिसांकडे हे प्रकरण थांबिण्यात कसे आले हा प्रश्र्न उभा राहतो.

एकंदरीत बिचाऱ्या अपघातग्रस्त युवकाच्या भावनेशी इथे खेळखंडोबा केल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट निदर्शनात येते. इतकेच नाही तर नागपूर मधील दवाखान्यातून हात कापून आणल्यानंतर त्या युवकाला भरपूर मदत मिळणार, फॉरेन मधून हात लावून देणार असे गाजर दाखवीत दोन महिने जिनींग मध्येच एका खोलीत लपवून ठेवण्यात आले असा युवकाचे मामा समाजसेवक राम सिंग राघव यांचा आरोप आहे. जनहीताचे मोठे डमरू येथिल जीनींग मध्ये खूप वाजतात मात्र या मुलास फुटक्या कवडीचीही मदत मिळाली नाही.उलट गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याच्यावर प्रचंड मानसिक दडपण आणले गेले असेही त्याचे मामा रामसिंग राघव यांनी सांगितले.

अखेर यवतमाळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घ्यावी लागली. या दडपशाहीच्या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. विशेष म्हणजे आम्ही खूप जनसेवा करतो म्हणून फुशारक्या वजा बातम्या पेरणाऱ्या महाभागांनी हात कटल्याची बातमी दडपून का टाकली हा भीषण प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे.

शेवटी उमदे स्वप्न घेऊन आलेला गरीब राजू हरामखोरीचा मोठा बळी ठरला.मारेगाव येथे मदतीची याचना करणारा उमदा कामगार शून्यात बघत वणवण भटकला.माणुसकीला काळीमा फासण्यात आली. राजू हा वसंत मध्ये येतांना दोन हातांनी आला आणि त्याच्या आयुष्यात वसंत न फुलताच एका हाताने हुंदके देत गावी परतला. हे येथे भयावह.
अन् स्वतःचा बॅनर,पोस्टर लावून उदोउदो करणाऱ्याने पाठ दाखवित मदतीचा भोपळा दाखविला.म्हणे कुत्री ने पिलांना जन्म दिला तरी रात्री बेरात्री खूप मदतीला धावून जाण्याचा दावा करणारी संघटना येथे मात्र मृतावस्थेतच नाही तर वांझोटी ठरल्याची चर्चा जोर धरत आहे.

या संतापजनक घटनेत राजुने थकून – हरून थेट दिल्लीहून मामा ला बोलविले. राष्ट्रीय सेवा संघात वरिष्ठ संबंध ठेवणाऱ्या मामा रामसिंग राघव यांनी न्यायासाठी येथे धाव घेतली. त्यांच्यावरही दवाब टाकण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी भिक घातली नाही. आणि गौरीशंकर खुराणा सह एकावर गुन्हा दाखल करण्यात यश मिळविले.प्रसिद्धीसाठी हपापलेला कंत्राटदार याने मात्र एका उमद्या कामगारावर एका हाताने आयुष्य काढण्याचा वेदनादायी प्रसंग आणून ठेवला.आता त्याचेवर उत्तर प्रदेश च्या न्यायालयात खटला दाखल होणार आहे.या दाव्यात लाखो रु.ची नुकसान भरपाई मागणार असल्याची माहिती राजूचे मामा रामसिंग राघव यांनी “विटा” ला दिली.

दरम्यान , आपल्या पोटच्या गोळ्याचा एक हात कटल्याने त्याच्या आयुष्याचे काय होणार ? हा प्रश्न विचारून राजुची आई सुनीतादेवी चव्हाण आर्त टाहो फोडत आहे.या गंभीर प्रकरणी नितीमत्तेला बाजूला ठेऊन अमानवीपनाचा कळस गाठण्यात आला एवढे मात्र खरे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment