– प्रशासनाकडून चार महिन्यापासून हुलकावणीचा आरोप
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वरुड येथील शेतकऱ्याच्या शेतात शेजारचा शेतकरी नाहक त्रास देत असून तारेचे कुंपण करण्यास मज्जाव करीत आहे.यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर मारेगाव तहसील समोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
मौजा वरुड येथील शेतकरी पांडुरंग बिजाराम भट यांचे शेत गट नंबर 104 /3 मध्ये तारेचे कुंपण करण्यास शेजारील शेतकरी असह्य त्रास देत आहे.प्रशासनास वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून हा गंभीर प्रश्न बेदखल होत असल्याचा आरोप पिडीत शेतकऱ्याने केला आहे.
दरम्यान, काही दिवसांवर पेरणीच्या हंगाम येवून ठेपला असून वन्यप्राण्यांच्या पिक नष्ठ करण्याच्या सुरक्षिततेसाठी शेताला कुंपण अनिवार्य असते.त्यासाठी पिडीत शेतकऱ्यांकडून होत असलेला प्रयत्न प्रशासनाकडून कमालीचा दुर्लक्षित होत असल्याने अखेर आपला न्यायहक्क पदरी पाडण्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे.
परिणामी , या प्रकरणात तलाठी व मंडल अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचाही आरोप करण्यात आला असून पिडीत शेतकऱ्याच्या आंदोलनाला कसा न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.