– पाच एकरात होणार क्रीडा संकुल
– खेळाडू निर्माण होण्याची स्वप्न होणार साकार
मारेगाव : कैलास ठेंगणे
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा अधिकारी यांनी पाच एकर जमीन तालुका क्रीडा संकुला करिता मंजूर करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. विविध सोयी सुविधा युक्त क्रीडा संकुल तयार होणार असल्याने क्रीडा प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
विविध सोयी सुविधा युक्त तालुका क्रीडा संकुल नसल्यामुळे आदिवासी बहुल मारेगाव तालुक्याची क्रीडा प्रतिमा खुंटली होती. तालुका निर्मितीपासून क्रीडा संकुलाची मागणी प्रलंबित होती. 80 च्या दशकात तालुक्याची निर्मिती पूर्ण झाली. तरी इतक्या वर्षात तालुक्यात सुसज्ज क्रीडा संकुलाची उभारणी होऊ शकली नाही. अखेर तत्कालीन उपविभागीय अधिकारी ,मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे व तत्कालीन नायब तहसीलदार दिगाबर गोहोकार यांनी वनविभाग कार्यालगत टाकरखेडा शेत शिवारातील गट क्रमांक 34 मधील दोन हेक्टर जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला.
वारंवार पाठपुरावा करून इतर शासकीय विभागाच्या त्रुटीची पूर्तता करण्यात आली. अखेर 28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी सदर जागेचा प्रस्ताव मंजूर केला व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे हस्तांतरणाची प्रक्रिया करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
क्रीडा संकुलचा उपयोग तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी होणार आहे. त्यामुळे तालुक्यात खेळाडू निर्माण होण्याची स्वप्ने साकार होण्याची चिन्हे दिसत आहे.