– बाईक रॅलीचे आयोजन
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मारेगाव शहरात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.स्थानिक डॉ.आंबेडकर रूपाच्या मूर्तीस शेकडोंनी पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीचे वतीने मारेगाव सलग दोन दिवस प्रबोधणात्मक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. आज 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रीघ लागली होती.पोलीस प्रशासन , शासकीय कर्मचारी , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील गणमान्य , आंबेडकरी अनुयायी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण ठाणेदार राजेश पुरी यांनी केले.शेकडोंच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.याप्रसंगी चंद्राभाऊ ठाकरे यांनी बाबासाहेबाच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला.धम्मराजिका बुद्ध विहारातील प्रांगणात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण तात्याजी चिकाटे , मनोहर भेले यांनी केले.बुद्ध रुपाला अनुयायी यांनी पुष्पमाला अर्पण करीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत निळ्या पताका लावीत बाईक रॅलीने शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.
आज सायंकाळी सात वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.