– डॉ.आंबेडकर मिरवणुकीत बंजारा डफडे ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
दीपक डोहणे : मारेगाव
14 एप्रिल, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती..सकाळचा अभिवादन सोहळा..सायंकाळी प्रतिमेची भव्य मिरवणूक.. पुतळ्यासमोरून डीजे ,बंजारा डफडेच्या तालावर बालकांसह युवक युवती व महिला पुरुषांनी ठेका धरला..मिरवणुकीत रंगीबेरंगी प्रकाशाचा झगमगाट..आणि नभात अचानक काळेकुट्ट ढग जमले ..वादळवारा.. विजेचा लपंडाव.. बरसणाऱ्या पावसाच्या सरी..यात अख्खे अनुयायी चिंब झाले.. मात्र बाबासाहेबां प्रती प्रेम कमी झाले नाही.. सर्वचजण बेभान थिरकले.. वरूणराजानेही अभिवादन सोहळ्यास हजेरी लावली..हा डोळ्यात साठवणारा भावनीक प्रसंग..काल मारेगावकारांनी अनुभवला.
मारेगाव येथील डॉ.आंबेडकर जयंतीची मिरवणुक अविस्मरणीय ठरली..!
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मारेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.ट्रॅक्टरवर वेगवेगळ्या फुलांचा साज.यात बाबासाहेब यांच्या भारदस्त व हसऱ्या चेहऱ्याच्या प्रतिमेची ओजस्वी भावमुद्रा.समोर प्रकाशमय वातावरण.यातच कलाविष्काराची मेजवानी म्हणून बंजारा डफडे व त्याच्या संगतीला डीजे.बाबासाहेबांच्या जयघोषात ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत निघाली.पावसाची तमा न बागळता आबालवृद्ध अनुयायी यांनी थिरकत ठेका शेवटपर्यंत कायम ठेवला.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काल निसर्गही मागे नव्हता.दिवसभर रखरखती उन काहिली माजवित असतांना सायंकाळी मिरवणूक निघताच पावसाच्या सरींनी मिरवणुकीत गारवा निर्माण केला.पावसाच्या सरी.विद्युत प्रवाह खंडीत तरीही बाबासाहेबांच्या गीतांवर अनुयायी ओले चिंब होत थिरकत होते. कुणीही या पावसाने डगमगले नाही .यातूनच बाबासाहेबा आंबेडकर यांच्या प्रती असलेली उत्कट भावना स्पष्टपणे दिसून आली.
ही मिरवणूक शहराच्या जुनी वस्ती , नगरपंचायत समोरून राज्य महामार्गावर मार्गक्रमण करीत डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.ज्ञानसागराच्या अथांग करूण सागरेत बुडून पावसाच्या सरी अंगावर घेऊन बाबासाहेब प्रती असणारी नितांत श्रद्धा कालच्या मिरवणुकीत अधोरेखित झाली.