– मारेगावात सहा.पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर ढुमणे यांना कर्तव्यातून निरोप
– न्यायाधीश निलेश वासाडे , ठाणेदार राजेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती
मारेगाव : दीपक डोहणे
ते तब्बल 32 वर्ष आपले शहर , गाव सुरक्षित ठेवण्यासाठी झटत होते.ऊन , वारा ,पाऊस , थंडी , रात्रंदिवस सेवा करीत 31 मार्च 2023 उजाडला कर्तव्याचा शेवटचा दिवस घेऊन. 58 वर्षीय लढवय्या.पोलिसांच्या डोळ्यात अश्रू ,हृदयात अभिमान ठेवत त्यांना पोलीस प्रशासनाने कर्तव्यातून निरोप दिलाय.या सहृदय प्रसंगी सर्वच जन भावुक झालेत. सेवानिवृत्त झालेल्या व गौरवास पात्र ठरलेल्या मारेगाव येथील सहाय्यक पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नारायण ढुमने असे त्यांचे नाव.
आपल्या कर्तव्यात कायद्याचे ज्ञान , सजग राहण्याची पद्धती , आयुष्याच्या प्रवासात कुठून कसे वळायचे असा जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारा या पोलीसदादाने चंद्रपूर जिल्ह्यातून कर्तव्याचा प्रवास करीत वरोरा , बल्लारशाह , यवतमाळ ,वणी , पांढरकवडा , शिरपूर , मुकुडबन व मारेगाव असा प्रशासकीय सेवेचा तब्बल 32 वर्षाचा प्रवास करीत मारेगावातच अनोख्या आयुष्यात प्रवेश केला.कर्तव्यात खाकी ड्रेस , डोक्यावर काळी टोपी , हातात दंडुका अशी धावपळीची कर्तव्य पार पाडत काल पासून त्यांना सुखाचा विसावा मिळाला आहे.
मारेगाव शहरात ‘ढुमने काका’ नावाने सर्वांना आपलंसं करीत हे साहेब 31 मार्च ला सेवानिवृत्त झाले.अतिशय भावनिक व तेवढाच गौरवशाली निरोप समारंभ सोहळा मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये 1 एप्रिल रोजी न्यायाधीश मा.निलेश वासाडे , ठाणेदार राजेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.यावेळी ज्ञानेश्वर ढुमने व त्यांच्या अर्धांगिनी सौ.सुधा ढुमने यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.मारेगाव वकील संघा तर्फे अँड.महेमुद खॉंन यांनी सत्कार करून मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस वाहनातून या दाम्पत्यांना बसवून प्रशासकीय सेवेतून निरोप देतांना उपस्थितांचा उर भरून आला.
खरं म्हणजे आयुष्यात निवृत्तीचे प्रकार वेगवेगळे असतांना ‘निवृत्ती’ हा दिवस प्रत्येकाच्या वाट्याला येतोच.निवृत्ती हा आयुष्याचा पूर्णविराम नसून ‘यंग सिनियर्स’ म्हणून धमाल करण्याची काही वर्षे आहेत आणि अशा दृष्टीकोणातून आपण सर्वांनी त्यांचेकडे पाहणं आजच्या काळात आवश्यक असल्याच्या भावना यावेळी प्रमुख अतिथी न्यायाधिश निलेश वासाडे व ठाणेदार राजेश पुरी यांनी व्यक्त केल्या.