– सावधान ! कष्टकरी जनता नागवली जात आहे
बोटोणी : सुनील उताणे
मारेगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व बहुसंख्य जमातीचं गाव म्हणून बोटोणीची ओळख.शेतीवर गुजराण करीत काबाडकष्ठ कष्टकरी जनता आता सर्रासपणे जुगार मटका आणि अवैधरित्या दारू विक्रीने आर्थिक दृष्ट्या नागविल्या जात आहे.प्रशासन मात्र मूग गिळून असल्यानेच हा धंदा बोटोणी सह आजुबाजूंच्या गावांना पोखरत आहे.
बोटोणी परिसरात 25 ते 30 गावे असून जमात असलेली पोड अधिकाधिक आहे.खडकाळ शेतीवर वर्षभराची कशीतरी गुजराण करीत येथील नागरिक जीवन कंठीत असतांना येथे आता अवैध व्यवसायाचा शाप लागला आहे.
ऐन शाळेच्या शंभर फुटावर राजरोसपणे मटका पट्टी फाडल्या जात आहे.त्यामुळे ज्ञानार्जनावरच आता प्रश्न निर्माण होत आहे.गावात तब्बल तीन ठिकाणी देशी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. गावातील दुसऱ्या बाजूलाही जुगार मटका सुरू असल्याने अवैध व्यवसायाने बोटोणीला वेढल्याची सदृष्य स्थिती आहे.
या व्यवसायाने सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा निर्माण होऊन अनेक कुटुंबात कलहाचे वातावरण आहे. यावर अंकुश कोण लावणार हा खरा प्रश्न बोटोणी करांना सतावतो आहे.
…………………………………………
तक्रारी वांझोटी ठरत असल्याने आता उपोषणाचा एल्गार
बोटोणीत अवैद्य व्यवसायाने डोके वर काढल्याने तंटामुक्ती समितीने ठराव घेत मारेगाव पासून यवतमाळ पर्यंत संबंधित प्रशासनास तक्रारी यापूर्वीच दिल्या आहेत.
मात्र या तक्रारी वांझोट्या ठरत असल्याने आता पुढील आठवड्यात पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसून गावातील सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे.
प्रमोद भसारकर
अध्यक्ष
म.गांधी तंटामुक्त समिती ,बोटोणी