◆ मारेगाव तालुका प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे पोलिसात निवेदन देऊन निषेध
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का प्रकाशित केली असा जाब विचारत निंगणुर (महागाव )येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्यावर ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने हल्ला चढवित शिवीगाळ केली.
सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.
महागाव निंगणूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर गेल्या सोळा वर्षांपासून आपला डेरा टाकून बसलेल्या मुडे नामक व्यक्तीची बातमी सौदागर यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती. त्याचा राग मनात धरून ओम प्रकाश मुडे यांनी पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केला. मनोद्दीन सौदागर यांच्यावरचा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारांवरचा हल्ला आहे. यामुळे पत्रकारांची गळचेपी होईल व पत्रकारांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊन लोकशाहीची पायमल्ली होण्यास वेळ लागणार नाही म्हणून मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ठाणेदारांना निवेदन दिले व दोषीवर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमन २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम, कार्याध्यक्ष दिपक डोहणे सचिव कैलास ठेंगणे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गोवर्धन , तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, संघटक रवि घुमे, पंकज नेहारे, विवेक तोडासे, रोहन आदेवार सुरज झोटिंग, सुनिल उताणे, कैलास मेश्राम यांचे सह देवेंद्र पोल्हे, केशव रिंगोले आदींची उपस्थिती होती.