◆ प्रभागाच्या विकासाला ठेंगा
◆ चक्क निविदातील अटी, शर्ती बदलविण्याचे षडयंत्र
मारेगाव : दीपक डोहणे
शहराचा सुंदर विकास होईल म्हणून मतदारांनी नगरसेवकांची मोठ्या आशेने निवड केली.मात्र प्रभागाचा विकास सोडून आपलाच कसा आर्थिक विकास होईल याच्या ध्यासाने काही नगरसेवक झपाटले आहे. यामुळे सुज्ञ नागरिक हताश झाले आहे.
न.प. मधुन आपलीच झोळी भरण्यासाठी काही नगरसेवक सतत मग्न असतात.कोणताही न.प. चा ठेका आपल्यालाच मिळावा यासाठी काही नमुने नगरसेवक जीव ओतून धावपळ करीत आहे.यामुळे नगर पंचायत मध्ये सध्या काही उतावीळ नगर सेवकांची मरमर बघायला मिळत आहे.
मारेगाव येथे सध्या एक स्वंयघोषित ‘महान समाजसेवक’ जनतेच्या हिताचे सोंग घेवून धुमाकूळ घालतआहे. शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा व्याजाने पैसे वाटून त्यांची कातडी सोलयची व त्यांना उलट आत्महत्या करू नका असे सल्ले देण्यात तो पटाईत आहे.त्या ‘सावकार प्लस समाजसेवक’ ने एका उतावीळ व धूर्त नगरसेवकाला हाताशी धरून ५० लाखाचा घनकचरा कंत्राट आपल्या घशात ओतला आहे. या कंत्राटच्या जोरावर सावकार आणि नगरसेवक जोडीने न. प. मध्ये अक्षरशः धुडघुस घातला आहे. या नगरसेवक पाठोपाठ आता दुसरा नगरसेवकही पाणी पुरवठाचे २५ लाखाचे कंत्राट घेण्यासाठी लगबग करीत आहे.
मारेगाव येथील नगरपंचायत चा सावळागोंधळ सर्वश्रुत आहे.मात्र येथील सभ्य नागरिक हा तमाशा मुकाट्याने सहन करीत आहे.एका धूर्त नगरसेवकाने तर चक्क घनकचराचे कंत्राट दुसऱ्या नावाने घेऊन आपली दादागिरी वाढविली आहे. सावकार प्लस समाजसेवक च्या गुलामीत अडकलेल्या या नगरसेवकाने घनकचरा कामावर असलेल्या गरीब महिलांना स्वतःच्या शेतातील कामे करण्याचे आदेश दिले होते मात्र एकीने त्यास सपशेल नकार दिल्याने त्या महिला मजुराला कामावरून काढून टाकले.ती बिचारी महिला मजूर आता तक्रारी घेऊन प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहे.मात्र समाजसेवेचे ढोंग करणाऱ्या या सोंगाड्या जोडीला या पिडीत महिलेची अश्रू कसे दिसत नाही हा प्रश्न सामान्य माणसाला आता पडलेला आहे.
सध्या उन्हाळा समोर येऊन ठेपला आहे.मारेगाव नगरपंचायत मधुन काही दिवसांनी पाणी पुरवठ्याचे देखभाल, दुरुस्तीसाठी निविदा कंत्राट निघणार आहे.त्यासाठी हा महाधूर्त नगरसेवक कमालीचा उतावीळ झाला आहे.
नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न घेऊन हा नगरसेवक त्या सावकार प्लस समाजसेवक भैय्या कडून आधीच भरमसाठ व्याजाने लाखो रूपये कर्ज घेऊन चक्रव्यूह मध्ये फसला आहे अशी सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.मालकाच्या खाल्या मिठाला जगण्यासाठी आता नगर पंचायत ला पोखरण्याचे डाव काही नगर सेवका कडून खेळले जात आहे. याकरीता ठेका आपल्यालाच मिळावा म्हणून निविदावरील नियम / अटी बदलविण्याचा घाट आखला जात आहे.आधीच कमालीचा वादग्रस्त ठरलेला एक अधिकारी याकामी कमिशन च्या लालसेने त्यांना मदत व मार्गदर्शन करीत आहे. पुन्हा दुसरा नगरसेवक या वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी लुडबुड करीत असल्याची विश्वसनीय माहिती “विटा” ला प्राप्त झाली आहे. यासाठी ओल्या अन तर्री च्या पार्टी सोबत रम,रमा,रमी ला उत आला आहे. संपूर्ण कंत्राट आपल्या घशात घालण्याचे षडयंत्र काही नगरसेवकांनी चालविले आहे.त्यामुळे प्रभागाचा विकास की स्वतःचा विकास ? साठी प्रतिनिधी निवडून आले आहे काय ? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.