◆ भीषण पाणी टंचाई : ६ लाखाचे बिल थकीत
◆ ग्रा.पं.चे तकलादू धोरण कारणीभूत : नागरिकांत संतापाची लाट
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील ग्रामपंचायतचा देयके थकीत झाल्याने वीज पुरवठा कापण्यात आला.त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे.नागरिकांना पाण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागत असून ग्रामपंचायतचे तकलादू धोरण कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे.
नवरगाव येथील सार्वजनिक व घरगुती नळयोजना कार्यान्वित आहे.ग्रामपंचायत प्रशासना करवी विजेचे तब्बल ५ लाख ८४ हजार हजार रुपये थकीत होते.विजेचा भरणा केला नसल्याने वीज कंपनीने हा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई ऐरणीवर आली आहे.किंबहुना येथील नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट सुरू आहे.
येथे केवळ तीन ते चार हातपंप असून नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडत आहे.ग्रामपंचायतीच्या तकलादू धोरणाचा परिपाक नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे.परिणामी लाखो रुपयांचे वीज बिल असतांना स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत असतांना याची झळ आता नागरिकांना पोहचत आहे.मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी मूग गिळून आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ देयके अदा करून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा व नागरिकांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबवावी अशी मागणी होत आहे.
” या संदर्भात प्रथम नागरिक असलेल्या सरपंच सुचिता कुमरे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी मी बाहेरगावी असल्याने याबाबत बोलू शकत नाही.अशा आशयाचे मत व्यक्त करीत वेळ मारून नेली.”
” मी नुकताच पदभार घेतला आहे.थकीत बिल व पाणी समस्येवर तोडगा आज तातडीने ग्रा.पं. मध्ये मासिक सभेचे आयोजन केले आहे.यात विस्तृत चर्चेअंती सकारात्मक तोडगा काढून नागरिकांच्या मूलभूत गरज असलेल्या समस्येला पूर्ण विराम देऊ.
श्री.किसन वारेकर
ग्रामसेवक , ग्रा.पं. नवरगाव (धरण)