◆ करणवाडी चौफुली वरील घटना
◆ झिंगलेल्या चालकाचे नियंत्रण सुटले
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथून तब्बल अकरा महिला मजूर घेऊन जाणाऱ्या मद्यपान करून असलेल्या ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून थांबापोल ला जबर धडक दिल्याने एक महिला मजूर ठार तर चार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारला सकाळी १० करणवाडी चौफुलीवर घडली.
मंदा सुनील रामटेके (४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे.प्रिया शांताराम धुर्वे , सुनीता परमेश्वर मडावी , निर्मला दिलीप आत्राम , सुंदराबाई नामदेव आत्राम असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील तब्बल ११ महिला मजूर कोंबलेला ऑटोरिक्षा गोधणी येथे सकाळी निघाला.मदीराचे सेवन करून झिंगलेल्या अवस्थेत ऑटोरिक्षा चालक महेश चांदेकर(२६) रा. घोडदरा हा सैरभैर वाहन चालवीत असतांना नियंत्रण सुटून करणवाडी चौफुलीवर असलेल्या थांबा पोल जबर धडक देत दोन पलटी घेतल्या.यात एकीचा उपचारादरम्यान मृत्यू , चार महिला गंभीर जखमी तर सहा महिला मजूर सुरक्षित असल्याचे कळते.परिणामी गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ चंद्रपूर / यवतमाळ हलविण्यात आले आहे.