◆ मारेगाव तालुक्यात विक्रीचे जाळे
◆ परप्रांतातून येतोय जाफराणी : अव्वाच्या सव्वाभावाने विक्रीत ‘मजा’
मारेगाव : दीपक डोहणे
महिलांसोबत पुरुषांचे मजा जाफराणी खर्रा खाण्याचे प्रमाण गगनाला पोहचले असून या जाफराणीवर बंदी असतांना विक्रीची व्याप्ती मात्र जिल्हाभरात आहे.किंबहुना बेरोजगारीचे प्रमाणही फोफावत असल्याने पाणठेला सदृष्य व्यवसायाने सर्वदूर कमालीचा उच्चांक गाठला आहे.आणि यावर लागणारी जाफराणी विक्री मात्र मारेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.
जाफराणी विक्रीचे केंद्र ठरत असलेल्या मारेगावात थेट गोडाऊन भरलेल्या तब्बल १४ लाख ६० हजार रुपयाच्या जाफरणीवर रविवारी अन्न औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला आणि मोठे घबाड बाहेर आले.जिल्हाभरात या जाफरणीची व्याप्ती असतांना पाहिजे त्या पद्धतीची कारवाई मात्र तोकडी ठरत आहे.
परप्रांतातून जाफराणी थेट मारेगावात
लाखो रुपयांची उलाढाल करीत मारेगाव येथील व्यापाऱ्यांनी जाफरणीचा गोरखधंदा चालविला आहे.भल्या पहाटे पासून टेम्पो भरून ग्रामीण भागात पालथे घालत ही विक्री केल्या जाते.थेट परप्रांतातून मारेगावात ही जाफराणी शहरासह सभोवताल खेड्यापाड्यात बिनधास्त विक्री केल्या जाते.जाफरणीचा साठा जमा करून ठेवण्यासाठी मारेगावात व्यापाऱ्याने गोडावूनची निर्मिती केली हे विशेष.मागील अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा प्रशासनाच्या नजरेआड असतांना आत्ताच कारवाईचा बडगा का उगारला असेल ? याबाबत वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले आहे.
संशायितास दोन दिवसाचा पिसीआर
रविवारला मारेगाव येथे जिल्हा प्रशासनाने छापा टाकून १४ लाख ६० हजार रु.ची जाफराणी , ०३ लाख ६० हजार ४६२ रुपये किमतीची टाटा एस.(मालवाहू टेम्पो )असा एकूण १७ लाख ६० हजार ४६२ रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशायित आरोपी मस्जिद शेख यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार भांदवी २७२,२७३,१८८,३२८ व विक्री प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम २६(२),२७,३०(२)(१),५९ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.आज सोमवारला मारेगाव न्यायालयात हजर केले असता संशायितास दि. ८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.या पिसीआर मध्ये नेमके कोणते पितळ उघडे पडते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.