◆ अजय रायपूरे यांच्या प्रयत्नाची फलश्रुती
◆ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सकारात्मक अहवाल
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील प्रामुख्याने वाहन धारकांची बाहेरगावी आरटीओ कॅम्प साठी परवड लक्षात घेता मारेगाव येथील आरटीओ कॅम्प सुरू करण्याचे सकारात्मक संकेत प्राप्त झाले आहे.येथील विदर्भाच्या लेखणीतून चे संपादक अजय रायपूरे यांच्या सातत्याने निवेदन तथा तक्रारीच्या पाठपुराव्याचे फलित समजल्या जात असून आता वाहन धारकांच्या परवडीला फुलस्टॉप बसणार आहे.
दरमहा वणी येथे तब्बल तीन आरटीओ शिबीराचे नियोजन असते.मात्र वाहन धारकांना प्रामुख्याने मारेगाव तालुक्यातून तीस ते चाळीस किमी.चे अंतर गाठावे लागतात.यामुळे विहीत वेळ , आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने किमान एका महिन्यातून एकदा मारेगाव येथे कॅम्प घेण्यात यावा अशी मागणी रायपूरे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती.
मारेगाव तालुक्यातील जनतेची परवड होऊ नये यासाठी उपप्रादेशिक विभागाने सकारात्मक पावले उचलीत वणी येथे दरमहा तीन कॅम्प ऐवजी दोन कॅम्प घेऊन एक कॅम्प मारेगाव येथे घेण्याचे संकेत दिले आहे.तशा आशयाचे पत्राद्वारे रायपूरे यांना अग्रेषीत करण्यात आले आहे.
दरम्यान , रायपूरे यांनी मारेगाव येथे कॅम्प सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा दिला असतांना निवेदनाचे सातत्य आणि ठोस भूमिकेची फलश्रुती समजल्या जात आहे.अवघ्या दिवसापासून आरटीओ कॅम्प मारेगाव येथे सुरू होणार असल्याने वाहनधारकांना असह्य त्रासाला फुलस्टॉप मिळणार आहे.किंबहुना या निर्णयाचे सर्वत्र वेलकम होत आहे.