◆ वाळू तस्करीसाठी शेतशिवाराला वेढा
◆ शेतकऱ्यांसह पिके प्रभावित
◆ वारेमाप महसूल गिळंकृत
◆ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे हात ओले ?
( भाग – ३ )
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यात अधिकृत रेती घाट सुरू करण्यात प्रशासनाचे अपयश तस्करांच्या माथी पडत असतांना शिवणी सह कोसारा , चिंचमंडळ येथील वाळू तस्करांनी सोयीचे रस्ते करीत अवैध रेती उपसा करण्याचा चांगलाच घाट मांडला आहे.चक्क वर्धा नदीला खिंडार पाडून तस्करांची वारेमाप लूट प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत असतांना आता कारवाईचा बडगा कोण उगारणार हा संशोधनाचा विषय बनला आहे.
वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या गावातील तस्करांची टीम अनधिकृत वाळू गिळंकृत करते आहे.दररोज रात्री खेळ करणाऱ्या तस्करांना लगाम घालण्यात प्रशासन अपयशी ठरते आहे.
सांजा सांभाळणारे तलाठी , स्थानिक कोतवाल , मंडळ अधिकारी आदी प्रशासकीय अधिकारी तोंडात बोटे घालून अप्रत्यक्षपणे तस्करांना सहकार्य करीत असल्याचा आरोप सर्वश्रुत चर्चेचा विषय ठरतो आहे.शिवणी तस्करांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच वाळू तस्करीसाठी तब्बल दोन ठीकाणी रस्ता काढून तस्करी चालविली आहे.वर्धा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास आजतागायत फस्त करण्यात आली मात्र आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही याबाबत वेगवेगळ्या साशंकता निर्माण होत आहे.
कमालीचे मुजोर बनलेले तस्कर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ट्रॅक्टरची वाट काढीत शासनाच्या महसुलाची वाट लावत प्रचंड धुळीने उभ्या पिकांचीही वाट लावण्याचा गोरखधंदा चालविल्या जात आहे.यामुळे शेतकऱ्यांत प्रशासन व तस्कराप्रती प्रचंड संतापाची लाट उसळत आहे.
बहुदा सारेच आलबेल ठरत असलेल्या या गोरखधंद्याचा विळखा सर्वदूर पसरला असतांना प्रशासनाची जाणीवपूर्वक साखरझोप बरेच काही सांगून जात असतांना अवघ्या दिवसात शिवारातील शेतकरी जिल्हाधिकारी यांचे दालनात वाळू तस्करांची व कर्तव्यशून्य कर्मचाऱ्यांची यादी सादर करणार आहे.त्यानंतरच खरे वास्तव समोर येत कुणावर कशी कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.