शिवणी तस्करांचा शासनाच्या जागेवर शेकडो ब्रास रेती साठा?

◆ ‘वाली’ च्या दिलजमाईने तस्करांचे वाढले मनोबल

(भाग – २)

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात तस्करांनी अनेक रेतीचे ढिगारे जमा केले आहे.मागेल त्याला वाळू अन ज्यादा दराने ग्राहकाला गिळू ? असा अघोषित नियम लागू करत तस्करांचे चांगलेच फावत शासनाच्या महसुलाची विल्हेवाट लावत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवणी झगडा परिसरात उजेडात आला आहे.
मारेगाव तालुक्याच्या सीमेवर अनेक गावे वसलेले आहे.यात शेकडो एकर जमीन वनविभागाच्या झाडे झुडपाने व्यापली आहे.शिवणी येथील मातब्बर तस्कर हजारो ब्रास वाळू फत्ते करीत असल्याने प्रशासकीय कर्मचारी जाणीवपूर्वक मूग गिळून असल्याचा सर्वस्तरावर आरोप होतो आहे.
दरम्यान , शिवणी येथील तस्करांनी नवनव्या शक्कल लढवीत जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू जमा केल्याचे सर्वसामान्य जनतेला निदर्शनास येईल अशी स्थिती आहे.मात्र स्थानिक प्रशासकीय कर्मचाऱ्यांना हे कसे निदर्शनास येत नसावे ? याबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे. कर्मचाऱ्यांची तस्करांसोबत हातमिळवणी तर नसेल ना ? अशीही तर्कवितर्काची झालर आहे.विशेष म्हणजे वनविभाग व शेतकऱ्यांच्या शेतातून सोयीस्कर वाहन जाईल असा रस्ता तयार करून रोजच रात्रीचा खेळ चालवीत शिवणी येथील राजकीय पदाधिकारी असलेल्या वाळू तस्करांनी वर्धा नदीच्या पात्रातून मलिंदा लाटण्याचा जोरकस प्रयत्न चालविला आहे.
वर्धा नदीच्या पात्रातून निघतांना आपले इप्सित साध्य करीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर जाण्याचे सोयीस्कर मार्ग केले आहे.काही तस्करांनी पाहिजे तेव्हा ग्राहकांना वाळू देण्यासाठी वनविभागाच्या जागेवर वाळू साठा उभा केले आहे. यावर कोण जप्तीची कारवाई करेल हा प्रश्न येथे अडगळीत आहे.रोज रात्रीला हजारो ब्रास वाळूची विल्हेवाट लावणाऱ्या महसूल प्रशासनासमोर कारवाईचे तगडे आव्हान उभे असतांना मात्र शासनाच्या लाखो रुपयांचा महसुलला कात्री लावण्यात नेमका कोण्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे याची चाचपणी करण्याची जबाबदारी आता अधिकारी वर्गावर असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन अधिकारी काय भूमिका वटवतील ? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.एकूणच दिलजमाईनेच कर्मचारी व तस्करांचे चांगलेच फावत असल्याच्या दुजोऱ्याला तिलांजली मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment