◆ गोधणी येथे भजन- कीर्तन गजरात महापुरुषांना अभिवादन
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व तुकारामदादा गीताचार्य यांच्या जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पालखीचे मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे टाळ मृदुगांच्या गजरात व राष्ट्रसंत , थोरपुरुषांच्या जयघोषाने मोठ्या आनंदासह भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात राष्ट्रसंताच्या विचारांचे बीजे भजन कीर्तनाचे माध्यमातून पेरण्यात आले.सलग दुसऱ्या दिवसाला गावातील लहान मोठ्यांच्या सहभागाने तुकडोजी महाराज पालखी काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्याने ठेवण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.गावरस्त्यावरील फडफडणाऱ्या पताका , टाळ मृदुगांचा गजर , प्रत्येक घरासमोरील अंगणात अन रस्त्याच्या दुतर्फाने रंगीबेरंगी रांगोळीची सजावट आणि हरिभजनात तल्लीन होऊन राष्ट्रसंताचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब होऊन गेला.यावेळी भाविकांनी दर्शन घेत एकच गर्दी केली होती.
पालखी , भजनाच्या गजरात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींची वेशभूषा व पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देणारे डोक्यावरील कुंडीतील झाडे आकर्षक ठरली.भविकासह प्रफुल्ल पावडे व प्रशांत मंडाळी यांनी पालखीची धुरा सांभाळत सोहळ्याची सांगता स्थानिक मंदिरात होऊन उपस्थित भाविकांना प्रबोधन करण्यात आले.दोन दिवसीय भक्तिमय सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी कैलास आसुटकर , पंढरी सोनटक्के , मोहन कोरांगे , नामदेव पावडे , रमेश गवळी , मारोती मडावी , माधव पिदूरकर , आदित्य तोडासे , देवराव मंडाळी , नामदेव मंडाळी आदींनी पुढाकार घेतला.