आध्यात्मिक कार्यातूनच मानवी जीवन सुखमय- आमदार बोदकूरवार

◆ गोधणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभिवादन सोहळ्याचे औचित्य

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

राष्ट्रसंतांनी शेतकरी , शेतमजूर व ग्रामिण जनतेच्या वेदना मांडल्या.त्यांनी कीर्तन व भजन या आध्यात्मिक कार्यातून प्रेरित होवून मानवी जीवन सुखमय होण्याच्या मूलमंत्र तंतोतंत खरा ठरतोय.त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रसंताना अभिप्रेत माणूस घडविण्याचे कार्य गोधणी येथील गुरुदेव मंडळाकडून होतेय हे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी केले.
ते मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे सोमवारला विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ द्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व गीताचार्य तुकारामदादा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याच्या अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.सरपंच मंदाताई मंडाळी , तुळशीराम डांगे , देवराव मंडाळी , सिडामे महाराज , तुळशीराम ठाकरे , आनंदराव मंडाळे , नथ्थुजी भोयर , जीवनराव आसुटकर , सिंधुताई गवळी , कमलाबाई गौरकार , सुभाष बलकी , रमेश गवळी आदींची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
आमदार बोदकूरवार पुढे म्हणाले , मानवी जीवनात आपण समाजासाठी काय केले हा महत्वाचा प्रश्न असतांना यासाठी त्यागाची भूमिका महत्त्वाची ठरते.जन्माचा अध्याय सुरू होते तेव्हा जीवनाचा आकार व सार कसा असावा हे प्रत्येकाने ठरवायचे असते.आयुष्यात सकारात्मक जीवन जगण्यासाठी व कुटुंबाचे सार्थक जीवन राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून घ्यावे.याचं गांभीर्य ओळखून तरुण पिढीने पुढे सरसावून राष्ट्रसंतांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा असा आशावाद यावेळी आमदार महोदयांनी व्यक्त केला.
गोधनी येथे सलग दोन दिवस भजन , कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक विचाराचे बीजे पेरल्या जाणार असून सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम गौरकार तर कैलास आसुटकर यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment