◆ मशीनची संथगती ठरतेय डोकेदुखी
◆ एक बटन तीनदा करावे लागतेय प्रेस
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
चोवीस तास तात्काळ रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून मारेगावात दोन एटीएम सुरू करण्यात आले. मात्र यातील सेंट्रल बँकेचे एटीएम केवळ बुजगावणे ठरत आहे तर स्टेट बँकेचे व्हेंटिलेटरवर आहे.त्यामुळे ग्राहकांना तात्काळ रक्कम काढण्यासाठी प्रचंड मनस्ताप होत असतांना संबंधित प्रशासन मात्र मूग गिळून आहे.
रहदारीवरील तालुका स्थळ असलेलं गाव म्हणून मारेगावची ओळख आहे.सर्वच प्रशासकीय कार्यालय , शाळा , महाविद्यालय असल्याने रोजची मानवी रेलचेल कायम असते.यातच कमीजास्त प्रमाणातील व्यवहार करण्याचे तात्काळ साधन म्हणून एटीएम कडे बघितल्या जाते.
परिणामी मारेगावात असलेले एक एटीएम मशीन कायम बंद अवस्थेत आहे.तर स्टेट बँक शाखेतील एटीएम मशीन अतिशय संथगतीने कार्यरत आहे.रक्कम काढताना या मशीनवर एकास किमान पंधरा ते वीस मिनिटं द्यावे लागतात.मशीनची एक बटन दोन – तीनदा प्रेस करावी लागते त्यामुळे तात्काळ पैसे काढण्यासाठी अधिकचा वेळ लागत मनस्ताप सहन करावा लागतो आहे.नागरिकांचे सोयरसुतक नसलेल्या संबंधित विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असून व्हेंटिलेटरवर आलेल्या एटीएम मशीनची दुरुस्ती करून नागरिकांच्या वेळेचा अपव्यय टाळावा अशी मागणी होत आहे.