◆ झरी तहसील समोर आंदोलन
◆ पिक विमा बनला शेतकऱ्यांसाठी गंभीर मुद्दा
झरी जामणी : नितीन कापसे
दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. महापूर, गारपीट, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची हानी होते. अशा संकटातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. पिकाची पेरणी पासून ते काढे पर्यंत नुकसान झाले असता नुकसानीचे स्तर पाहून जोखीम रक्कम जाते.
परंतू गेल्या वर्षी आणि यावर्षी अतिृष्टीमुळे शेतकऱ्याना अतोणात नुकसान होवुन सुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नाही. अनेकदा निवेदन देऊन सुध्दा दुर्लक्ष करत असल्याने दिनांक २ जानेवारी पासुन तहसिल कार्यालया समोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मागील वर्षी मिळालेला अत्यल्प विमा वाढवून द्यावा. सन २०२१-२२या चालू वर्षात ८०७४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या सर्वांना १००% म्हणजे ४६२००रूपये रक्कम देण्यात यावी. पिकविम्यासाठी तालुकास्तरीय पीकविमा नऊ सदस्यीय समिती मध्ये कोण आहे ? त्यांची नावे व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी केलेला पाठपुरावा व कार्य यांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी . घोषणा केल्याप्रमाणे चालू पीक कर्जदारांना ५० हजार रूपये अनुदान लवकर देण्यात यावे. या मागण्या घेवून संदीप बुरेवर , निलेश येल्टीवार,राहुल दांडेकर, गंगाधर अत्राम ,राकेश गलेवार यांचेसह अनेक शेतकरी उपोषणाला बसून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.