◆ कानडा चोरी प्रकरण
◆ पथकाचे हात रिते
◆ तपास थंडबसत्यात
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कानडा शिवारामध्ये आठ ते दहा अट्टल चोरट्यांनी चौकीदाराला चाकूचा धाक दाखवीत 32 लाख रुपयाचे 24 टन ॲल्युमिनियम चोरी केल्याची घटना सात नोव्हेंबर रोजी घडली होती. या गंभीर घटनेचा छडा लावण्याकरिता पोलीस विभागाने तात्काळ पथकेही गठीत केली. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटत असताना सुद्धा पोलिसांचे हात रिते आहे. त्यामुळे सदर चोरीचा छडा लावण्याचे पोलीस विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कानडा येथे सात नोव्हेंबरच्या रात्री चौकीदाराला चाकूचा धाक दाखवीत 32 लाख रुपये किमतीचे 24 टन अल्युमिनियम ट्रक मध्ये भरून चोरट्यांनी पोबारा केला .याबाबत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. तात्काळ चोरीचा छडा लावण्याकरिता स्थानिक पोलिसांचे दोन पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक, सायबर क्राईम चे एक पथक असे एकूण पाच पथके निर्माण केले. मात्र तब्बल दोन महिन्याचा कालावधी लोटत असताना सुद्धा पोलिसाच्या हाती काहीच गवसले नाही. अद्यापही पोलिसांना कुठलाही मार्ग सापडला नसल्याने तपास थंडावला आहे. दोन ट्रक मध्ये चोरट्यांनी ॲल्युमिनियम भरून पोबारा ठोकला. त्या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरणही पोलिसांना अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन चोरट्यांनी चोरी केली. आता तब्बल दोन महिन्याचा कालावधी लोटत असताना चोर सापडतात की गायब होतात हे पाहणे औचित्यांचे असेल.
पोलीस काय म्हणतात…..
सदर चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे अजून पर्यंत कुठलाही सुगावा लागलेला नाही.
ठाणेदार राजेश पुरी