◆ मारेगावात प्रा.कराळे यांनी उडविले मार्मिक प्रतिबिंबाचे फवारे
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
समाजपयोगी व उच्चपदस्था पर्यंत पोहचण्यासाठी नियमित अभ्यासाचा चढता आलेख व्यक्तिमत्व घडविण्याची फलश्रुती ठरते.त्यासाठी दिलखुलासपणे समोर जाण्यासाठी मनाचा ठाव गरजेचा आहे.अलीकडच्या असहमतीच्या व्यवस्थेवर आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेत सामाजिक , राजकीय , आर्थिक , महागाई , बेरोजगारीवर प्रहार करीत भरगच्च व्याख्यान कार्यक्रमात मार्मिकतेने भाष्य करीत खदखद मास्तर प्रा.नितेश कराळे सरांनी हास्याचे फवारे उडवित स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , मराठी विभाग कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर रोजी आयोजित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.कराळे सर बोलत होते.मंचावर प्राचार्य डॉ.अविनाश घरडे अध्यक्षस्थानी होते.रंगनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अँड.देविदास काळे, लोढा मल्टीस्पेशालिटीचे संचालक डॉ.महेंद्र लोढा हे स्वागताध्यक्ष होते.सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले , अविनाश लांबट , पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर , जिल्हाध्यक्ष अनिल राठोड , शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे , ठाणेदार राजेश पुरी , कार्याध्यक्ष दीपक डोहणे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.कराळे यांनी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून उपस्थित हजारो विद्यार्थी तथा जनसमुदायास वर्तमान परिस्थितीच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करीत गंभीरतेने व विनोदाने उपस्थितांचे मने जिंकली.विद्यार्थी दशेपासून उच्चपदस्थ समाजपयोगी माणूस घडविण्यासाठी नियमित अभ्यासाची जोड प्रतिपादित करीत प्रा.कराळे यांनी वाढत्या महागाईचा आलेख ,बेरोजगारी , भरकटत असलेला विद्यार्थी , शेतकरी आत्महत्या या गंभीर बाबीवर चिंता व्यक्त करीत कार्यक्रमात विनोदाचे फवारे उडवित अभ्यासक्रम , मुळाक्षरे , व्यंजने आदींवर अभ्यासपूर्ण विवेचन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील खदखद दूर करीत आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीची चुणूक दाखवीत उपस्थितांच्या मनावर भुरळ पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेश चवरे , पत्रकार संघाचे रोहन आदेवर यांनी प्रास्ताविक तर प्रा.गजानन सोडनर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता होताच प्रा.कराळे सर झाले कैद…!
आपल्या विनोदी प्रबोधनाची तरलता समाजमाध्यमातून विद्यार्थी तथा तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भुरळ पाडणारे खदखद मास्तर प्रा.कराळे यांची एन्ट्री मारेगावात पर्वणी ठरली.कार्यक्रमाची सांगता होताच विद्यार्थ्यांनी प्रा.कराळे यांचे सोबत फोटोसेशन साठी गराडा घातला.शेकडो विद्यार्थी , नागरिक व प्राध्यापकांनी आपल्या मोबाईल मध्ये खदखद मास्तरला कैद केले.यावेळी फोटोसेशन साठी चांगलीच झुंबड उडाली होती.