◆ वेगाव-वडगाव(उजाड) रस्ता जलमय
◆ प्रकल्पाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्पाच्या ढिसाळ नियोजनाने प्रकल्पाचे पाणी भर पांदण रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे.जणू काही नदीचे स्वरूप प्राप्त झाल्यागत या पांदण रस्त्याची पुरती वाट लागली आहे.शेतकऱ्यांना येजा करण्यास प्रचंड अडसर निर्माण होत असल्याने प्रशासनाप्रती संतापाची लाट उसळत आहे.
तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्पातुन शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून कालव्यातून किमान २७ किमी.अंतरावरील नियोजन आहे.मात्र हा कालव्या नजीकची जलवाहिनी फुटून यातील पाण्याचा प्रवाह थेट वेगाव वडगाव ( उजाड )पांदण रस्त्यावर आला आहे.ऐन पांदण रस्त्याने पाणी ओसंडून वाहत असल्याने जणू काही नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे विदारक चित्र आहे.
सदरील पांदण रस्त्याच्या सभोवताल शेकडो हेक्टर शेती असून शेतकऱ्यांना शिवारात जाण्यास प्रचंड अडसर निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतातील कामे प्रभावित होत आहे.
मध्यम प्रकल्प प्रशासनाच्या तकलादू धोरणाचा परिपाक शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरत असून थेट पांदण रस्त्याने ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा कायम बंदोबस्त करावा व शेतातील प्रभावित झालेले कामे पूर्ववत मार्गी लागण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी आर्त मागणी शिवारातील शेतकऱ्यांची आहे.