◆ राष्ट्रसंतांच्या भजनांनी गाजला उपोषण मंडप
◆ अखेर मागण्यावर तोडगा निघाला
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांच्या विविध समस्या घेऊन काँग्रेसने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. तिसऱ्या दिवशी खासदार बाळू धानोरकर यांच्या मदतीने सर्व मागण्यावर तोडगा निघाला. यांवेळी मान्यवराच्या हस्ते लिंबू सरबत पासून उपोषण सोडण्यात आले. राष्ट्रसंताच्या भजनाने उपोषणाची सुरुवात व सांगता करण्यात आली, हे विशेष!
तालुक्यातील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांच्या विविध समस्या शासकीय स्तरावर प्रलंबित असताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या या प्रश्नाकडे डोळेझाक करते, हा सर्वसामान्यांचा अनुभव! असाच काहीसा अनुभव राजकीय पक्षांना सुद्धा येत आहे.
त्यामुळे तालुक्याला विविध प्रश्नांनी ग्रासले असल्याने काँग्रेस पक्षातर्फे वारंवार निवेदन, विनंती करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद वखनोर , उपसरपंच प्रफुल विखनकर, माणिक पांगुळ यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यात विजेचा प्रश्न ,सिंचन प्रश्न ,ग्रामीण रस्त्याची दैना अवस्था, अतिवृष्टी अनुदान, महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन अनुदान, पिक विमा, वन्य प्राण्याचा हैदास आदी मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी एक डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.(आमरण उपोषणाची सांगता करतांना शेतकरी बांधव)
सतत दोन दिवस प्रशासनाने या उपोषणाकडे डोळेझाक केली. अखेर खासदार बाळू धानोरकर यांनी या उपोषणाची दखल घेत आज ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उपोषण मंडप भेट दिली. भेट देतात सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचा फौज फाटा तात्काळ दाखल झाला. खासदार बाळू धानोरकर यांनी सर्वच विभागाच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता पाटील ,तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे सह आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत दिले . कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, वसंत जिनिंग संचालक गजानन खापणे, वसंतराव आसूटकर, शंकर मडावी, माजी सभापती कू त्तरमारे, शरीफ कुुरेशी, सह आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.