– निर्धारित जागेवरच विक्रीचा अंमल व्हावा
– सुरज महाजन यांची वरिष्ठाकडे तक्रार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
देशातील महत्वपूर्ण व सर्वाधिक मोठा सण असलेल्या दिवाळी सणात फटाक्याची विक्री जोमात असते. ही विक्री अधिकृत परवाना धारकांना निर्धारित केलेल्या मारेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर करावयाची आहे मात्र निवडक परवानाधारक व
अनधिकृत व्यवसाय धारक थेट रस्त्यावर बसून नियमांची पायमल्ली करीत असल्याने त्यांचेवर कारवाईचे फटाके लावा आणि संभाव्य धोका टाळा अशा आशयाची तक्रार मारेगाव येथील सुरज महाजन यांनी वरिष्ठाकडे केली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाका विक्री करिता मारेगाव प्रशासनाने नगरपंचायत प्रांगणात जागा निर्धारित केली आहे. यात अधिकृत परवानाधारक आपले दुकाने थाटत फटाक्याचा व्यवसाय करतात.मात्र, काही अधिकृत व अनधिकृत फटाका विक्रेते सणासुदीच्या काळात थेट सार्वजनिक रहदारीच्या व गर्दीच्या ठिकाणी बसून व्यवसाय करीत आहे. आठवडी बाजारातही बिनधास्त विक्री करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
परिणामी,या प्रकाराने नागरिकांच्या जिवितास संभाव्य धोका निर्माण होवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने व फटाके हे ज्वलनशील आणि स्फोटक स्वरूपाचे असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता बळावली आहे.यावर प्रशासनाने तात्काळ अंमल करून कारवाईचे फटाके लावावे अशा आशयाची तक्रार येथील सुरज महाजन यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.