– रस्त्यासाठी जेन-झी च करणार आंदोलनाचे नेतृत्व
मारेगाव : संतोष रोगे
मारेगाव तालुक्यातील अनेक गावांकडे जाणारे रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहे. वारंवार निवेदन , तक्रारी दिल्यानंतर जी.प. बांधकाम विभागाला जाग येवून रस्ता सुधारणा करण्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मात्र हे अंदाजपत्रक वांझोटे ठरू नये. तात्काळ रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे अन्यथा शाळकरी विद्यार्थीच आता रास्ता रोको करून प्रशासनास जागे करणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील रस्ते डगमळीत असून शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना कमालीचा त्रासाने कंबरडे मोडत आहे. किंबहुना नागरिकांसोबत वाहनांची ऐशीतैशी होत असतांना अनेकांना मानेच्या, कंबरेच्या असह्य त्रासाने कवेत घेतले आहे.
तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत अनेक राजकीय, सामाजिक संघटनेने आजतागायत निवेदने दिल्यानंतर बांधकाम विभागास (जि.प.) जाग येवून तालुक्यातील खडकी ते घोडदरा 6.40 लक्ष, चिंचाळा ते पाथरी 6.26 लक्ष, वागदरा, मेंढणी ते हटवांजरी बुरांडा 8.20 लक्ष, आकापूर ते चिंचाळा 5.70 लक्ष रु.त रस्त्याची सुधारणा करण्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय झरीजामणी यांनी आदेश अग्रेषित केले आहे.
दरम्यान, या कामाचा तात्काळ अंमल करावा व नागरिकांची ससेहोलपट थांबवावी अन्यथा जेन -झी आता आंदोलनाचे नेतृत्व करीत रास्ता रोको करणार असल्याचा ईशारा घोडदरा येथील पालकांनी दिला असल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.