कुंभा अपडेट.. चेतनच्या मृत्यूचे गूढ अद्यापही गुलदस्त्यात

 

– शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल सादर 

– चेतनवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चेतन ऊर्फ चिक्या मनोज चांदेकर याचा मृतदेह गुरुवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील गदाजी बोरी येथील नाल्यात आढळला.त्याचे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, प्राथमिक अहवालानुसार चेतनचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, तपासातील सैलपणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

दोन संशयित ताब्यात

बालक बेपत्ता झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी आणि ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके तयार करण्यात आली होती. सुमारे ४० ते ४५ पोलिस कर्मचारी, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. गुरुवारी सायंकाळी गदाची बोरी येथील नाल्यात चेतनचा मृतदेह आढळल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

 

या आधारे पोलिस विविध शक्यता तपासत आहेत. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. मात्र, चेतन नाल्यापर्यंत कसा पोहोचला?आणि त्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला? याबाबत अद्याप अधिकृत खुलासा संबंधित प्रशासनाकडून झालेला नाही.

 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

चेतनवर शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुंभा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावापासून सहा किलोमीटर अंतरावर नाल्यात बालकाचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. घटनेचा लवकर उलगडा करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तब्बल 48 तासानंतरही अद्याप तपासाचा निष्कर्ष समोर न आल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment