मध्यवर्ती सह.बँक निवडणूक… चूरशीच्या लढतीत कुणाचे पारडे जड?

 

– सोसायटी गणात अवघे 22 मतदार 

– दहा पाठविले सहलीला 

मारेगाव : दीपक डोहणे 

अवघ्या पाच दिवसावर असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत दोन उमेदवारात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मारेगाव तालुक्यात सोसायटी गणात निर्णायक व अवघे 22 मतदार असतांना एका उमेदवाराने तब्बल दहा मतदार तीर्थक्षेत्राला पाठविल्याच्या खमंग चर्चेला पेव फुटले आहे.याच खेम्यातील विजयश्री खेचून आणण्यासाठी “पट्टीचे दोन मतदार” ही निवडणूक निर्णायक ठरवून एकाचा विजय सुनिश्चित करणार आहे.

 

जिल्हा बँक निवडणूक येत्या 10 तारखेला आहे. चुरशीत होणाऱ्या आणि दुहेरी रंगत वाढलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित आमदार संजय देरकर यांच्या सुविद्य पत्नी किरण देरकर या शेतकरी सहकार विकास आघाडी कडून तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांचे सुपुत्र सारंग ठाकरे हे बळीराजा सह. पॅनलचे अपक्ष उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावीत आहे.

 

राज्यात महाविकास आघाडी दिल्ली ते गल्ली पर्यंत एकदिलाने निवडणुका लढवितांना दिसत असतांना मारेगाव तालुक्यात प्रामुख्याने सोसायटी गणात आघाडीला काँग्रेसने सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी कडून किरण देरकर यांना उमेदवारी बहाल झाल्यानंतर आघाडीत दुफळी माजवून एका काँग्रेस पुढाऱ्याने पुत्रासाठी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे.नेहमीप्रमाणे आपल्याच आघाडीत शह काटशहाचे राजकारण करणाऱ्या नेत्याच्या दुर्गुन वर्तवणुकीने निष्ठावान कार्यकर्त्यात प्रचंड संताप आणि संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

 

दरम्यान, अवघे बारा मतदार एका उमेदवाराचा विजय सुनिश्चित करणार आहे. एका उमेदवाराने दहा मतदार मन परिवर्तीत करण्यासाठी सहलीला पाठविल्याची चर्चा रंगत आहे. याच उमेदवारांचे दोन ‘पेठ’ मतदार तालुक्यातच डेरे दाखल असून त्यांच्याकडे दिल्ली संसद प्रतिनिधी पासून तर स्थानिक कार्यकर्त्यांनी पालथे घालणे सुरु केले आहे. दोन मतदारांनी “निष्ठेचा” शब्द नेमका कुणाला दिला? हे गोपनीय असले तरी या निवडणुकीत निर्णायक मतदारांतील लपंडावाच्या खेळात नेमके कुणाचे डावपेच यशस्वी होते हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment