
– गोधणी, पेंढरी, सुसरी येथे रिष्टर स्केलवर 3.0 तीव्रतेची नोंद
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव–झरी तालुक्यातील असलेल्या बाउंड्रीवरील गावात सोमवारी (दि. 8 जून) सायंकाळी 5.12 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.0 इतकी नोंदवण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या संस्थेने या भूकंपाची अधिकृत नोंद घेतली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा पेंढरी, सुसरी आणि गोधणी या परिसरादरम्यान असल्याची प्राथमिक माहिती “विटा” ला प्राप्त झाली आहे.
दोन तालुक्यातील गावात सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांना जाणीवही झाली नाही.मात्र, दिवसभरातील हालचालींमुळे असे सौम्य धक्के अनेकदा लक्षात येत नाहीत, तर रात्रीच्या वेळी ते अधिक जाणवतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वणी–मारेगाव–झरी परिसर हा खनिज संपत्तीने समृद्ध असून येथे चुनखडकाचे प्रमाण अधिक आहे. भूगर्भात पाणी गेल्यास चुनखडकाशी प्रतिक्रिया होऊन सूक्ष्म हालचाली निर्माण होऊ शकतात, ज्यातून असे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवतात. त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्याने खानकामादरम्यान होणाऱ्या ब्लास्टिंगमुळेही भूगर्भीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत भुभर्गशास्त्र अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.