– जानेवारीत झाला होता अपघात
– हैद्राबाद, मुंबई, नागपूर, चंद्रपूर येथे होते उपचार सुरु
मारेगाव : दीपक डोहणे
दीड वर्षाचा निरागस बाळ.आईच्या कुशीत चारचाकी वाहनात असतांना हे वाहन अपघातग्रस्त होत रस्त्याच्या कडेला जावून पडते. यातच बालकास गंभीर इजा झाली . चंद्रपूर, नागपूर, हैद्राबाद व मुंबई असा उपचाराचा त्याचा प्रवास आज कायमचा थांबला .तब्बल अकरा महिने जगण्याचा संघर्ष येथे थिटा पडून क्रूर नियती जिंकली अन मारेगावचा निरागस बाळ “अहेमान” कायमचा विसावला.
मागील जानेवारी महिन्यात मारेगाव येथील शेख बरकत कुटुंब अर्टीका वाहनाने चंद्रपूर कडे जात असतांना निंबाळा नजीक अपघात होवून शेख नवाज शेख मुजफ्फर हा जागीच ठार झाला होता तर पाच जन जखमी झाले होते. यात अहेमान बरकत शेख या दीड वर्षीय बालकाची मानेची नस तुटल्याने त्याचेवर शस्रक्रिया करण्यात आली. मुंबई, हैद्राबाद, नागपूर असा उपचाराचा प्रवास नियमित होता. गोंडस बाळ या अपघाताने तब्बल अकरा महिने निपचित होता. मुंबई येथील उपचाराने केवळ लिक्विड वर त्याचे जगणे अवघड झाले होते. मध्यंतरी अहेमान याला मारेगाव येथे आणून नागपूर येथे हलविले मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी घरी नेण्याचा सल्ला दिला.अकरा महिन्याच्या जगण्याच्या संघर्ष थिटा पडून व क्रूर नियतीने थट्टा करीत अहेमान याची प्राणज्योत मालवून आज सकाळी जगण्याला पूर्णविराम मिळाला.
गोंडस व निरागस बाळ अहेमान शेख बरकत (2.5)वर्ष याची जगण्याची झुंज आज थांबल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.