– वणीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार ढसाढसा रडले
मारेगाव : दीपक डोहणे
वणी विधानसभा क्षेत्रात विजयाची हॅट्रिक हुकल्याने कमालीचे व्यथित होत संजीवरेड्डी बोदकूरवार भर सभेत अक्षरशः हुंदके देत अश्रूला वाट मोकळी करून दिली.गद्दारांनी ऐन निवडणुकीत कामे केल्यानेच पराभवाला समोर जावे लागले किंबहुना पराभवाची सल ढसाढसा रडण्यात व्यक्त केली.
प्रसंग होता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकाला नंतर आपल्या निवासस्थानी भाजप च्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन.
वणी विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संबोधित करतांना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार कमालीचे भावुक झालेत. आपल्या अवघ्या पंधरा मिनिटांच्या भाषणात त्यांना हुंदके अनावर होत होते. वारंवार चष्मा काढीत अश्रूला वाट मोकळी करून देत डोळे पुसत असतांनाची चित्रफीत समाजमाध्यमावर जलदगतीने प्रसारीत झाली आहे.सलग तिसऱ्यांदा विजयाची खात्री बाळगणाऱ्या व अनपेक्षित पराभव कसा जिव्हारी लागतोय हेच या प्रसंगातून अधोरेखित झाल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गद्दारांना निर्वाणीचा ईशारा
ज्या तत्परतेने मागील दहा वर्ष जनहिताची कामे केली हे पक्षातील काही गद्दारांना रुचले नाही. आपल्यासोबत फिरून महाविकास आघाडीचे काम केले त्या बेईमान आणि गद्दारांना आता पक्षात थारा नाही.त्यांना आता माझ्या पायरीवर चढू देणार नाही असा सज्जड दम देत नेमके हे गद्दार कोण? या जोरदार चर्चेने आता वेग धरला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत यापुढेही अधिक जोमाने आपण जनसेवेची झूल पांघरून कार्य करण्यावर भर देवू हे सांगायला माजी आमदार विसरले नाही.